टी-१ वाघीण मृत्यू प्रकरण; वनअधिकारी व कर्मचाऱ्यांची सहा तास चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:43 IST2018-11-14T17:42:50+5:302018-11-14T17:43:33+5:30
पांढरकवडा - टी-१ अवनी वाघिणीच्या मृत्यू चौकशी संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने तीन सदस्यीय समितीने बोराटी जंगलात घटनास्थळावर जावून तब्बल सहा तास चौकशी केली.

टी-१ वाघीण मृत्यू प्रकरण; वनअधिकारी व कर्मचाऱ्यांची सहा तास चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पांढरकवडा - टी-१ अवनी वाघिणीच्या मृत्यू चौकशी संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने तीन सदस्यीय समितीने बोराटी जंगलात घटनास्थळावर जावून तब्बल सहा तास चौकशी केली. यावेळी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शार्पशुटर अजहरअली खान याचीही चौकशी करण्यात आली.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असेल्या टी-१ या वाघिणीला २ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास बोराटी जंगलातील पुलाजवळ शार्पशुटर अजहरअली खान याने गोळी घालून ठार केले. तेव्हापासून या घटनेचा वन्यजीवप्रेमी व काही राजकीय नेत्यांनी निषेध करणे सुरू केले. वनमत्र्यांसह संपूर्ण शासनाला विरोधकांनी धारेवर धरले. त्यामुळे या वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने तीन सदस्यीय समिती गठीत केली. ही समिती मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास थेट टी-१ वाघिणीला ज्याठिकाणी ठार मारण्यात आले, त्याठिकाणी गेली. त्यानंतर घटनास्थळाचे निरीक्षण केले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या या तीन सदस्यीय समितीमध्ये सेवानिवृत्त अॅडिशनल पीसीए ओ.पी.कालर, वन्यजीव नियंत्रण व्याघ्र विभागाचे उपसंचालक जोस लुइस व एनटीसीचे सहाय्यक महानिरीक्षक या तिघांचा समावेश आहे. या समितीने घटनास्थळाचे निरीक्षण केल्यानंतर पांढरकवडा वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. शार्पशुटर नवाब शहाफत अली खान याचा मुलगा अजगर अली याचीसुद्धा चौकशी करण्यात आली. वाघिणीला प्रथम ट्रँक्युलाईझ करण्यात आले की नाही, थेट गोळ्याच घालण्यात आल्या की काय, याबाबत वनसमितीने सखोल चौकशी केली. दिल्ली येथून आलेल्या या चौकशी समितीने घटनास्थळावर दुपारी १ ते ६ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास चौकशी केली. त्यानंतर लोणी येथील बेस कॅम्पमध्ये येऊन त्यांनी सर्व कागदपत्रांची, पंचनाम्याच्या प्रतीची तपासणी केली. त्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास ही समिती पांढरकवडा येथे आली. विश्रामगृहावर मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळीच उमरीच्या विश्रामगृहावर गेली. त्याठिकाणी काही संबंधितांचे बयाण नोंदविण्यात आले. त्यानंतर परत ही समिती घटनास्थळावर गेली.
राज्य शासनाची समिती १७ नोव्हेंबरला येणार
राज्य शासनातर्फे अवनी टी-१ वाघिणीच्या मृत्यू संदर्भात चारजणांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीत प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एच.पाटील, वन्यजीव विभागाचे डॉ.बिलाल हबीब, अनिश अंधेरिया, सहाय्यक मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांचा समावेश आहे. ही समिती येत्या १७ नोव्हेंबरला चौकशीसाठी घटनास्थळावर येणार आहे.