रांगोळीच्या ठिपक्याने अवघड गणित बनले सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 16:07 IST2021-12-23T15:57:44+5:302021-12-23T16:07:36+5:30
राष्ट्रीय गणितदिनी भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त रांगोळ्यांतून गणितीय आकृत्या आयत, त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोणाचे प्रकार, सूत्र यांचे आरेखन करण्यात आले.

रांगोळीच्या ठिपक्याने अवघड गणित बनले सोपे
यवतमाळ : शालेय अभ्यासक्रमातील अवघड विषय म्हणजे गणित. याच्या नावानेच अनेकजणांना धडकी भरते, बे एके बे करता-करता नाकी नव येते. त्यामुळे, अनेक विद्यार्थी गणित म्हटलं की नाक मुरडतात. परंतु, याच गणिताशी एकदा का मैत्री झाली तर ती आयुष्यभरासाठी ठरते.
गणित म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. परंतु, गणिताच्या संकल्पना स्पष्ट झाल्या की तो सहज सोपा वाटतो. जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयातील विद्यार्थिनींनी गणिताच्या संकल्पना आपल्या रांगोळीच्या थेंबातून सहजपणे स्पष्ट केल्या आणि विद्यार्थ्यांना अवघड गणित विषयात रस निर्माण झाला.
राष्ट्रीय गणितदिनी भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ३२ विद्यार्थिनींनी भूमिती व गणितीय संकल्पनांवर आधारित रांगोळ्या रेखाटल्या. या रांगोळ्यांतून गणितीय आकृत्या आयत, त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोणाचे प्रकार, सूत्र यांचे आरेखन करण्यात आले. रांगोळी कलेतून गणितासारख्या अवघड विषयातील मूळ संकल्पना स्पष्ट झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.
रांगोळी स्पर्धेशिवाय गणितीय संकल्पनांसह परिपाठही विद्यार्थ्यांनी सादर केला. यावेळी गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना वेतन विभागाचे लेखाधिकारी आर. आर. ठाकरे, लेखापरीक्षक एन. यू. फाटकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.