एसटी महामंडळाने दिली अस्थायी कामगारांना बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:24 IST2018-11-23T22:23:34+5:302018-11-23T22:24:09+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रशासकीय कामांचा खेळखंडोबा सुरू आहे. आस्थापना विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे.

एसटी महामंडळाने दिली अस्थायी कामगारांना बढती
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रशासकीय कामांचा खेळखंडोबा सुरू आहे. आस्थापना विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे. हजारावर कामगारांना मागील अनेक वर्षापासून स्थायी करण्यात आलेले नाही. यामध्ये भविष्यात कर्मचाऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.
एसटी महामंडळात रुजू झाल्यानंतर प्रथम वेतनवाढ देण्यापूर्वी कामगारांना स्थायी करणे आवश्यक आहे. मात्र यवतमाळ विभागात ही प्रक्रियाच मागील काही वर्षांपासून करण्यात आलेली नाही. या कर्मचाºयांना महामंडळाचे सर्व आर्थिक लाभ मिळत आहे. मात्र स्थायी करण्यात आले नसल्याने त्यांची सेवा नेमकी किती वर्ष झाली हा प्रश्न पुढील काळात निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे कामगारांना स्थायी करावे लागते यापासून काही कर्मचारी अनभिज्ञ आहेत. सदर प्रक्रियेची जबाबदारी सांभाळणारे कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाºयांना यासाठी जबाबदार धरून कारवाई करावी तसेच जुन्या तारखेपासूनच स्थायी आदेश काढण्यात यावे, अशी मागणी या कामगारांमधून जोर धरू लागली आहे.
दरम्यान एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव सुरेश कन्नाके यांनी यासंदर्भात विभाग नियंत्रकांकडे तक्रार नोंदविली आहे.
खातेअंतर्गत बढती
स्थायी नसलेल्या कर्मचाऱ्यांना खाते अंतर्गत बढती देण्याची किमया यवतमाळ विभागात करण्यात आली आहे. स्थायी कर्मचाऱ्यांनाच अटी पूर्ण करत असल्यास बढती परीक्षेस परवानगी दिली जाते. यानंतरच पुढे बढती मिळते. यवतमाळात मात्र एसटी महामंडळाच्या सर्व नियमांना तिलांजली देवून अस्थायी कामगारांना बढती दिली गेली आणि दिली जात आहे.