आर्णी मार्गावर भरधाव कार स्कूल व्हॅनला धडकली; सहा विद्यार्थी जखमी
By सुरेंद्र राऊत | Updated: September 7, 2022 16:36 IST2022-09-07T16:34:51+5:302022-09-07T16:36:37+5:30
कारचालक चुकीच्या दिशेने करत होता प्रवास

आर्णी मार्गावर भरधाव कार स्कूल व्हॅनला धडकली; सहा विद्यार्थी जखमी
हिवरी (यवतमाळ) : येथील आर्णी मार्गावर सम्राट ढाब्याजवळ भरधाव कारने गावातून विद्यार्थी घेऊन येणाऱ्या स्कूल व्हॅनला धडक दिली. यात सहाविद्यार्थी जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजता घडली.
हिवरी, किन्ही या गावातील विद्यार्थी यवतमाळातील जायन्टस इंग्लिश मीडियम स्कूल येथे येतात. नेहमीप्रमाणे त्यांना घेऊन येणाऱ्या व्हॅनला भरधाव कारने समोरासमोर धडक दिली. यात सृष्टी अमोल महेर, किरण ससनकार, अनुज किरण ससनकार रा. हिवरी, महेंद्र तलमले यांचा मुलगी रा. किन्ही, शैलेश दिगांबर पौळ, समर्थ दत्ता गावंडे हे विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले.
एम.एच.२९/ए.डी.९२९२ ही कार विरुद्ध दिशेने आर्णीकडे जात होती. कारचालकाने त्याची बाजू सोडून चुकीच्या लेनवरून कार पुढे नेली. यामुळेच विद्यार्थ्यांच्या वाहनाला धडक बसली. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.