पुसद बाजार समितीत शुकशुकाट
By Admin | Updated: July 14, 2016 02:33 IST2016-07-14T02:33:35+5:302016-07-14T02:33:35+5:30
शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा निर्णय शासनाने घेतल्याने या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झाले

पुसद बाजार समितीत शुकशुकाट
शेतकऱ्यांचे हाल : सोमवारपासून व्यापारी संपावर, अडत वसुलीला विरोध
पुसद : शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा निर्णय शासनाने घेतल्याने या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाला असून सलग तिसऱ्या दिवशी बाजार समितीत शुकशुकाट होता.
शासनाने बाजार समिती नियमातून फळे, भाजीपाला वगळ्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यात खदखद होती. त्यातच यापुढे शेतमालाच्या विक्रीसाठी आकारली जाणारी तीन टक्के अडत आता खरेदीदारांकडून वसूल करण्याचा निर्णय झाल्याने व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुसद बाजार समितीतील १३० अडते-व्यापारी सोमवारपासून संपात सहभागी झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. या बाजार समितीत प्रतिवर्षी सरासरी दोन लाख क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री होते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी फारसा शेतमाल शिल्लक नसला तरी अडचणीतील शेतकरी थोडाफार माल घेवून अडतीवर येतात. मात्र संपामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बाजारात दिवसभर थांबूनही ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला माल एक तर परत घेवून जावा लागत आहे. अथवा कवडीमोल भावाने विक्री करावा लागत आहे. त्यातही किरकोळ बाजारात काही छोटे व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत माल खरेदी करून तो चढ्या भावाने विकत आहेत.
दुसरीकडे संपामुळे बाजार समितीत मधील हमाल, तोलाई कामगार या कष्टकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अडत दुकानातील व्यवहार बंद असलयने त्याचा परिणाम इतर बाजारपेठेवर झाला आहे. शेतमाल विक्री करून शेतकरी इतर वस्तूंची खरेदी स्थानिक बाजारपेठेतून करत असतो. त्यामुळे स्थानिक व्यापारी बाजारात व्यवहारावरही परिणाम झाला आहे. संपाचा फटका व्यापाऱ्यांसह ग्राहक, शेतकरी, हमालांना बसत आहे. संपामुळे बाजार समितीचा व्यवहार ठप्प असून अडते, व्यापाऱ्यांशी चर्चा केली. पण तडजोड झाली नाही. शासनाकडून जसे निर्देश येतील त्याची अंमलबजावणी बाजार समिती करेल, अशी माहिती बाजार समितीचे सचिव शिवाजी मगर यांनी दिली.
सरकारने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेवून आमच्या मागण्या बाबत सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला अडते व्यापारी मदत करीत असतो, असे मत अडते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय भांगडे यांनी व्यक्त केले. शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी संप पुकारला असून मागील तीन दिवसांपासून आमच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. संप तीन दिवसापासून असला तरी रविवारपासूनच मार्केट बंद आहे. त्यामुळे लवकर हा संप मिटला नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असे मत शंकर ताडसे हमालाने व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)