"भारताचा नेपाळ करायची वेळ आली"; सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध यवतमाळमध्ये देशद्रोहाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:09 IST2025-10-30T09:09:19+5:302025-10-30T09:09:19+5:30
व्हायरल पोस्टवरून माग काढत पोलिसांची कारवाई

"भारताचा नेपाळ करायची वेळ आली"; सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध यवतमाळमध्ये देशद्रोहाचा गुन्हा
यवतमाळ : येथील सामाजिक कार्यकर्ता रोहन रामटेके याच्याविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षक पाहिजेत म्हणून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता.
या फोटोवर 'सरकारने महाराष्ट्राचा बिहार केला, आता जनतेवर भारताला नेपाळ करायची वेळ आल्याची' कमेन्ट करून तो फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. विवेक सुभाष सज्जनवार (रा. यवतमाळ) यांनी रोहन रामटेके याच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
व्हायरल पोस्टवरून माग काढत पोलिसांची कारवाई
तक्रारीनुसार, फिर्यादी विवेक सज्जनवार यांनी २८ ऑक्टोबर रोजी त्यांची इन्स्टाग्राम आयडी ओपन केली. यावेळी त्यांना रोहन रामटेके याच्या इन्स्टाग्राम आयडीवर शिक्षक पाहिजे या मागणीचा जिल्हा परिषदेत धडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाचा व्हिडीओ दिसला.
त्यावर रोहन रामटेके याने 'सरकारने महाराष्ट्राचा बिहार केला, आता भारताला नेपाळ करण्याची जनतेवर वेळ आली', अशी पोस्ट व्हायरल केली. त्यावरून यवतमाळ शहर पोलिसांनी रोहन रामटेकेविरुद्ध कलम १५२ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.