Return rains in October damage 22,000 hectares of crops | ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने २२ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने २२ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

ठळक मुद्देकापसाला सर्वाधिक फटका : १५ कोटी रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात चांगलाच धुमाकूळ घातला. या पावसात जिल्ह्यातील २२ हजार हेक्टरवरील पिके क्षतीग्रस्त झाली आहे. या क्षेत्रावर ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने मदतीसाठी प्रशासनाकडून १५ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
परतीचा पाऊस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोसळला. दारव्हा आणि दिग्रस तालुक्यामध्ये ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. ६० मिमी पेक्षा अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टी नोंदविली जाते. या दोन तालुक्यांमध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेले २२ हजार ७४० हेक्टर क्षेत्र आहेत. कृषी, महसूल आणि तहसील विभागाच्या संयुक्त पंचनामे शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले.
जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कापसाचे झाले आहे. १२ हजार १९५ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहे. तर आठ हजार १७५ हेक्टरवरील सोयाबीन क्षेत्राचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर दोन हजार ३७० हेक्टरवरील तूर पिकाला याचा फटका बसला आहे.
शासकीय निकषानुसार हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांची मदत नुकसानग्रस्त क्षेत्राला दिली जाणार आहे. त्यानुसार २२ हजार ७४० हेक्टरकरिता जिल्ह्याला १५ कोटी ४६ लाख ३२ हजार रुपयांची मदत लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या नुकसानग्रस्त क्षेत्राला दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. प्रत्यक्षात ही मदत नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी तोकडी पडणार आहे. या पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा प्रशासनापुढे यायचा आहे.
जिल्ह्यातील दारव्हा आणि दिग्रस या दोन तालुक्यातीलच नुकसानीची ३३ टक्के पेक्षा अधिक बाधित क्षेत्र म्हणून नोंद झाली आहे. इतर १४ तालुके यामध्ये नोंदविल्या गेले नाही. या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.

पावसाळ्यात ३१ हजार हेक्टरची हानी
जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ३१ हजार १२७ हेक्टरचे नुकसान शासनाच्या दरबारी नोंदविल्या गेले आहेत. या क्षेत्रासाठी २२ कोटी रुपये लागणार आहे. कोरडवाहू क्षेत्रासोबत बागायती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. नुकसानी पोटी मिळणारी मदत शेतकऱ्यांना अपुरीच राहणार आहे.

Web Title: Return rains in October damage 22,000 hectares of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.