रिलायन्सच्या सीईओंसह सहा जणांवर गुन्हा; नुकसानग्रस्त शेतकरी सोडून शेतात पीक नसणाऱ्या शेतकऱ्याला मदत कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 17:12 IST2024-10-16T17:10:32+5:302024-10-16T17:12:08+5:30
पीक विमा कंपनी: कृषी विभागातील सांख्यिकी अधिकाऱ्याची तक्रार

Reliance CEOs, six charged; How to help the farmer who has no crop in the field except the damaged farmer?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात २०२३ मध्ये प्रचंड अतिवृष्टी होऊन ११० महसूल मंडळातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विमा कंपनीकडून मदत अपेक्षित असताना यामध्ये मोठी अफरातफर करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना मदत मिळालीच नाही, उलट ज्याच्या शेतात पीक नव्हते अशा शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला देण्यात आला. हा सर्व प्रकार कृषी विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर सांख्यिकी विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रविवारी रात्री या प्रकरणात यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात मे. रिलायन्स जनरल विमा कंपनी मुंबई याच्या सीईओंसह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सीईओ राकेश जैन (४८), प्रमुख शासकीय व्यवसाय अधिकारी प्रकाश थॉमस (४०), उपाध्यक्ष शासकीय व्यवसाय रिजवान मोहम्मद कॅभवी (४८) जोखीम राज्य व्यवस्थापक विजय मोरे (४०) राज्य व्यवस्थापक प्रमोद पाटील (३८), जोखीम जिल्हा विमा योजना व्यवस्थापक स्वप्नील घुले (३५) अशी गुन्हा नोंद झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. यांच्यावर पीक नुकसानीच्या सर्व्हेक्षणात अनियमितता केली. तसेच शासन आणि प्रशासनाची फसवणूक करण्यात आली, असा ठपका ठेवला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्या पिकांच्या नुकसानीचे वेळेत सव्र्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न करता विमा कंपनीने शेतकऱ्यांना वेठीस धरले. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावरून चौकशी सुरू झाली. यातून हे वास्तव पुढे आले. पीक विमा कंपनीने कृषी विभागाला चौकशी कोणतेच सहकार्य केले नाही. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अतिशय कमी रक्कम टाकून एकप्रकारे त्यांची थट्टा केली. यावरून राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकाराची माहिती घेण्यासाठी कृषी उपसंचालक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असता, त्या शेतकऱ्यांच्या शेतात पीक आढळून आले नाही, तरी विमा कंपनीने काहींना पीक नुकसानीचा लाभ दिला. तर दुसरीकडे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची शेतकऱ्यांनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही. काही शेतकऱ्यांना केवळ ७६८ रुपये इतकी मदत दिली.
या सर्व गौडबंगालाची कृषी विभागाच्या सांख्यिकी शाखेने पडताळणी केली. त्यानंतर तंत्र अधिकारी प्रदीप वाहाने यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून या प्रकरणात कलम ४२०, ३४ भांदविनुसार संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.