राज्यातील २०७ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात असताना आता पिकांवरच संक्रात

By रूपेश उत्तरवार | Updated: August 7, 2025 12:30 IST2025-08-07T12:29:35+5:302025-08-07T12:30:38+5:30

अशा स्थितीत पिकांची वाढ करण्यासाठी लागणाऱ्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे किडींचे आक्रमण झाले आहे. यातून खरिपाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका आहे...

Rainfall below average in 207 talukas of the state; While farmers are in trouble due to pest infestation, now the crops are also affected | राज्यातील २०७ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात असताना आता पिकांवरच संक्रात

राज्यातील २०७ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात असताना आता पिकांवरच संक्रात

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात १० दिवस उशिरा पेरण्या सुरू झाल्या. आता पावसाने पाठ फिरविल्याने विदर्भ-भराठवाड्यातील  पिके संकटात सापडली आहेत. राज्यातील २०७ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात उन्हाचा चटका वाढल्याने पिके काेमेजत आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे. अशा स्थितीत पिकांची वाढ करण्यासाठी लागणाऱ्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे किडींचे आक्रमण झाले आहे. यातून खरिपाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका आहे.

संपूर्ण राज्यभरात ३५८ तालुके आहेत. यातील २०७ तालुक्यांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा कमी पाऊस कोसळला आहे. यामुळे पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणचे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके संकटात सापडली आहेत. वाढीच्या अवस्थेत पाणी न मिळाल्याने पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. यात अल्पावधीत हाती येणाऱ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.

पावसाची टक्केवारी 
२५ ते ५० टक्के पाऊस बरसलेले १० तालुके 
५० ते ७५ टक्के पाऊस बरसणारे ६७ तालुके 
७५ ते १०० टक्के पाऊस  १४० तालुके 
१०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस १३७ तालुके 

सोलापुरात पाच तासात १०९ मिमी पाऊस
सोलापूर : जुलै महिन्यातील कसर भरून काढताना बुधवार, ६ ऑगस्ट रोजी शहरात पाऊस धो-धो बरसला. मध्यरात्री २ वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी ८ वाजेपर्यंत पडत होता. पाच तासांत १०९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, घरांमध्ये आणि शाळांमध्येही पाणी शिरले आहे.

एक कोटी ३७ लाख हेक्टरवर पेरण्या
राज्यात एक कोटी ४४ लाख हेक्टरपैकी एक कोटी ३७ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. या ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांवर हुमणी अळीचा उद्रेक वाढला आहे.
यातून शेत शिवार उधवस्त होत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. जून, जुलै महिन्यांत अपुरा पाऊस बरसला. ऑगस्टमध्ये आता कडकडीत ऊन पडत आहे.  यातून शेतकरी धास्तावले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून पाच जणांचा मृत्यू
यवतमाळ : शेतात काम करताना अंगावर वीज पडून जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला. वणी तालुक्यातील अडेगाव खंड क्रमांक दोन, पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूर आणि यवतमाळ तालुक्यातील रोहटेक शेतशिवारात या घटना घडल्या.


 

Web Title: Rainfall below average in 207 talukas of the state; While farmers are in trouble due to pest infestation, now the crops are also affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.