वणी तालुक्यात प्रदूषणाने गावे काळवंडली, नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:31 IST2025-01-15T17:29:36+5:302025-01-15T17:31:08+5:30
Yavatmal : प्रदूषण ओकणाऱ्या उद्योगांवर कारवाई केली जात नसल्याने नागरिकांत संताप

Pollution in villages in Vani taluka, respiratory diseases increase among citizens
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मागील काही वर्षात तालुक्यात प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे त्वचा, श्वसनाचे आजार वाढले आहेत. उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी यंत्र बसविण्यात आली आहेत. मात्र, सद्यस्थितीत यंत्रे धूळखात पडली आहेत. प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण ओकणाऱ्या उद्योगांवर कारवाई केली जात नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
वणी तालुक्यात विपुल खनिज संपदा आहे. सोबतच दळणवळणाची सुविधा असल्याने या परिसरात मोठे उद्योग सुरू झाले. या उद्योगांच्या धुरामधून बाहेर पडणारे विविध विषारी वायू, धुळीचे कण यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे. तर, उद्योगातून बाहेर फेकणारे सांडपाणी यामुळे जलप्रदूषण होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना त्वचा, श्वसनाच्या आजाराचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या उद्योगांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रदूषण ओकणाऱ्या उद्योगांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आहे.
नव्या लोकप्रतिनिधींकडून नागरिकांची अपेक्षा
वणी विधानसभा मतदारसंघातील वणी तालुक्यात आठ कोळशाच्या खाणी तर अनेक मोठे उद्योग आहेत. या उद्योगांमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. यावर कोणत्याच उपाययोजना नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी या समस्येची दखल घ्यावी, अशी मागणी आहे.