यवतमाळ-वाशिमसाठी ११ एप्रिलला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:28 PM2019-03-11T21:28:58+5:302019-03-11T21:29:44+5:30

लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला असून यवतमाळ-वाशीम मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Polling for Yavatmal-Washim on 11th April | यवतमाळ-वाशिमसाठी ११ एप्रिलला मतदान

यवतमाळ-वाशिमसाठी ११ एप्रिलला मतदान

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : २१ लाख मतदार ठरविणार नवा खासदार, चंद्रपूर-आर्णीतही पहिल्याच टप्प्यात मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला असून यवतमाळ-वाशीम मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या तीन मतदारसंघात विभागले गेले आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद हे विधानसभा मतदारसंघ येतात. शिवाय, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात वणी, आर्णी हे विधानसभा मतदारसंघ मोडतात. उर्वरित उमरखेड विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभेत समाविष्ट आहे.
लोकसभेच्या या तीन जागांसाठी जिल्ह्यात एकंदर २१ लाख २८ हजार १६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ११ लाख ५ हजार ३७० पुरुष तर १० लाख २२ हजार ७६४ इतकी महिला मतदारांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकंदर २४९१ मतदान केंद्र राहणार आहेत.
यवतमाळ वाशीम लोकसभेकरिता ११ एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदारसंघात जिल्ह्यातील १२ लाख ५५ हजार २८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर वाशीम जिल्ह्यातील ६ लाख ३५ हजार ५४६ मतदार आहेत. अशा पद्धतीने एकंदर १८ लाख ९० हजार ८२९ मतदारांचा प्रतिनिधी म्हणून यवतमाळ-वाशीमचा खासदार निवडून जाणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता, राळेगाव २७९३१२, यवतमाळ ३७३६३८, दिग्रस ३१६७६८, पुसद २८५५६५, वाशीम ३४०८०२, कारंजा २९४७४४ अशी मतदारांची संख्या आहे.
पत्रकार परिषदेला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, आरडीसी ललितकुमार वºहाडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे आदी उपस्थित होते.
२२ ठिकाणी वाहन तपासणी - एसपी
आचारसंहितेचा कुठेही भंग होऊ नये यासाठी प्रशासनाची विविध पथके कार्यरत करण्यात आली आहे. जिल्ह्यात सीमावर्ती भागांमध्ये तब्बल २२ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिली. जिल्ह्यातील ११ मतदान केंद्र संवेदनशील असून मतदारांना कोणीही दारू, पैशाचे आमिष दाखविणार नाही, याबाबत दक्षता घेतली जात असल्याचे ते म्हणाले.
दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोय
जिल्ह्यातील ४ हजार ७८१ दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदान केंद्रांवर रॅम्पची सोय केली जाणार आहे. दिव्यांग, तसेच वृद्धांसाठी स्वतंत्र रांग असेल. दृष्टीहीन मतदारांसाठी बॅलेट युनिटवर ब्रेल लिपी असेल. त्यांच्या मार्गदर्शनासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती असेल. गरज पडल्यास दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरही पुरविली जाणार आहे. विशेष म्हणजे, अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी अ‍ॅप’ सुरू केला आहे. या अ‍ॅपवरून दिव्यांग मतदाराने आपली अडचण प्रशासनाला सांगितल्यास त्याला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहन पाठविले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, याच अ‍ॅपवरून दिव्यांगाला मतदार नोंदणीही करता येणार आहे.
आचारसंहितेत मतदारच राजा
निवडणूक आचारसंहितेच्या काळात मतदार हाच खरा राजा राहणार आहे. कोणताही उमेदवार, राजकीय कार्यकर्ते आचारसंहितेचा भंग करीत असल्यास त्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकाला थेट आयोगाकडे करता येणार आहे. त्यासाठी ‘सी व्हिजिल’ हा मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग होत असल्याचा फोटो त्यावर कोणीही अपलोड केल्यास १०० मीनिटांच्या आत भरारी पथक पोहोचून कारवाई करणार आहे.
प्रशासनाला ‘सुगम’, उमेदवारांना ‘सुविधा’
निवडणुकीच्या कामात नेमके कोणते, किती साहित्य लागेल, याची माहिती प्रशासनाला अद्ययावत मिळत राहावी, यासाठी सुगम हे सॉफ्टवेअर वापरण्यात येत आहे. तर दुसरीकडे उमेदवारांनाही त्यांच्याशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी ‘सुविधा’ हे सॉफ्टवेअर वापरता येणार आहे. त्यावर लॉगीन केल्यास उमेदवारांना नामांकनापासून मतमोजणीपर्यंत ‘अपडेट’ राहता येणार आहे. विशेष म्हणजे, मतमोजणीच्या वेळी प्रत्येक फेरीत आपल्याला किती मते मिळाली, याचेही अपडेट मिळत राहणार आहे. निवडणूक खर्चासाठी प्रती उमेदवार ७० लाखांची मर्यादा असून त्यासाठी नामांकनापूर्वीच स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे.

१८ मार्चपासून नामांकन प्रारंभ
१८ मार्चपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात होईल. २५ मार्चच्या दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज भरता येणार आहे.
२६ मार्चला अर्जांची छाननी होईल.
२८ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल, त्याच दिवशी चिन्हवाटप केले जाईल.
११ एप्रिलला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होईल.
२३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

हिंगोलीमध्ये १८ एप्रिलला मतदान
जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होणार आहे.

सोशल मीडियावर वॉच
मतदानाच्या ४८ तासापूर्वीच प्रचार थांबवावा लागणार आहे. त्यासोबतच सोशल मीडियातून होणाºया प्रचारावर विशेष वॉच ठेवला जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग कमिटी’ जिल्ह्यात दाखल होणार आहे. उमेदवारालाही आपले सोशल मीडिया अकाउंट सर्टिफाईड करून घ्यावे लागणार आहे. नामांकनासोबतच आपली संपत्ती, पॅनकार्ड नंबर, इन्कमटॅक्स रिटर्न आदींसह आपल्यावरील गुन्ह्यांचीही माहिती जाहीर करावी लागणार आहे.

डायल करा, यादी तपासा
ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नसल्याचे कळल्याने अनेकांची अडचण होते. त्यावर मात करण्यासाठी यंदा प्रशासनाने ‘१९५०’ हा हेल्पलाईन नंबर सक्रीय केला आहे. तो डायल करून मतदाराला आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची खातरजमा करता येणार आहे. यादीबाबत काही अडचण असल्यास या क्रमांकावरून समाधान केले जाणार आहे.

Web Title: Polling for Yavatmal-Washim on 11th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.