पाच भाविकांच्या निधनाने पंचक्रोशी गहिवरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:05 PM2019-04-13T22:05:56+5:302019-04-13T22:06:32+5:30

राळेगाव तालुक्यातील रिधोरा या छोट्याशा गावाने पाच भाविकमनाचे गावकरी अपघातात गमावले. देवदर्शनाला जाताना कुणाला काहीही कल्पना नसताना अचानक मृत्यूने गाठले. मृतकांवर शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Panchkrashi Gahawrali death of five devotees | पाच भाविकांच्या निधनाने पंचक्रोशी गहिवरली

पाच भाविकांच्या निधनाने पंचक्रोशी गहिवरली

Next
ठळक मुद्देशोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : रिधोरा गावातील एकाही घरात चूल पेटली नाही

मंगेश चवरडोल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : राळेगाव तालुक्यातील रिधोरा या छोट्याशा गावाने पाच भाविकमनाचे गावकरी अपघातात गमावले. देवदर्शनाला जाताना कुणाला काहीही कल्पना नसताना अचानक मृत्यूने गाठले. मृतकांवर शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेमुळे संपूर्ण वडकी पंचक्रोशी गहिवरली असून गावात एकाही घरात चूल पेटली नाही.
वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव फाट्याजवळ शुक्रवारी हा भीषण अपघात घडला. रिधोरा गावातील काही महिला वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील आजनसराकडे निघाल्या होत्या. भोजाजी महाराज देवस्थानात दर्शन घेऊन वाढदिवस करण्यासाठी हा जत्था निघाला होता. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील कारेगाव फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या आॅटोरिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास १५ जण गंभीर जखमी झाले.
मृतांपैकी येनुबाई जुमनाके यांच्या पार्थिवावर शुक्रवारीच रात्री ११ वाजता अंत्यविधी करण्यात आला. तर अरविंद बोरुले, संगीता बोरुले, उमाबाई शेंडे, जया लोनबले यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यविधी करण्यात आला. यावेळी तालुक्यातील अनेक राजकीय पुढाऱ्यांसह परिसरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती. या दुखद घटनेची वार्ता पसरताच पंचक्रोशीत शोककळा पसरली.
जखमींच्या उपचारासाठी लोकवर्गणी
या भीषण अपघातात जखमी झालेल्यांपैकी काही जणांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा कठीण प्रसंगी गावकरीच मदतीला धावून आले. गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
चिमुकल्यांचा आक्रोश
या भीषण अपघातामुळे ललित अरविंद बोरुले आणि वेदिका अरविंद बोरुले हे बहीण-भाऊ पोरके झाले आहेत. त्यांचे आईवडील अपघातात मृत्यू पावले. अंत्यसंस्कारावेळी या चिमुकल्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

Web Title: Panchkrashi Gahawrali death of five devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.