नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : संपूर्ण विदर्भातच नव्हे तर मराठवाडा व शेजारच्या तेलंगणातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या केळापूर येथील प्रसिद्ध श्री जगदंबा संस्थानात येत्या ७ तारखेपासून ते १४ तारखेपर्यंत नवरात्र उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे. संस्थांनतर्फे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. विश्वस्त मंडळार्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या अटी व शर्ती राखून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून दर्शन घेण्याची विनंती संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे यांनी केली आहे.
मंदिरात जाण्यापूर्वी हे वाचा
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शासनाचे सर्व नियम पाळावेत. याबाबत नियमावलीचे फलक लावण्यात आले आहेत. प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य आहे. भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे. गर्भगृहासमोर लावलेल्या काचेच्या दरवाजापासून दर्शन घ्यावे. सर्वांनी तोंडाला मास्क लाऊनच मंदिरात प्रवेश करावा, भक्तांनी रांग लावताना विशिष्ट अंतर ठेवावे.
१८ वर्षांखालील भक्तांचे काय? दहा वर्षांच्या आतील व साठ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी प्रवेश नाही. शक्यतोवर कोरोना लसींचे दोन्हीही डोस घेतलेल्यांना प्रवेश राहणार आहे. नियमानुसार दोन व्यक्तींमध्ये तीन मीटरचे अंतर आवश्यक राहील.
देवीच्या मुखवट्याची शोभायात्राही नाही
दरवर्षी घटस्थापनेच्या दिवशी संस्थानच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावरून श्री जगदंबा देवीच्या मुखवट्याची वाजतगाजत केळापूरच्या मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येते. ही शोभायात्रा म्हणजे पांढरकवडावासीयांसाठी एक पर्वणी असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही शोभायात्रा काढण्यात येणार नाही.
एकीकडे कोरोनाचे सावट कायम आहे. संस्थानने भाविकांसाठी नियम व अटी घातल्या आहेत. दरवर्षी येथे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदाही तशी तयारी केली जात आहे. यासाठी मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या काळात भाविकांसाठी उद्यान सुरू ठेवण्यात येणार आहे.
ओटी भरण्याची व्यवस्था मंदिराच्या बाहेर देवीची ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या बाहेर ओटी भरण्याची व्यवस्था केली आहे. मागील वर्षीच्या कोरोना महामारीचा प्रकोप लक्षात घेता भाविकांना दर्शन घेता यावे, म्हणून शासन आदेशाच्या अधिन राहून नियमावली करण्यात आली आहे. परिस्थितीनुसार यामध्ये बदल करण्याचे अधिकार संस्थानने आपल्याकडे राखून ठेवले आहेत.