दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना केवळ नोटीस, कंत्राटींवर मात्र कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 07:30 IST2021-02-03T07:29:51+5:302021-02-03T07:30:28+5:30
पोलिओ डोजऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजण्याच्या प्रकरणात भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश मनवर व डाॅ. भूषण मसराम यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना केवळ नोटीस, कंत्राटींवर मात्र कारवाई
यवतमाळ : पोलिओ डोजऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजण्याच्या प्रकरणात भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश मनवर व डाॅ. भूषण मसराम यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याप्रकरणी सोमवारी तिघांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
कंत्राटी व मानधन तत्त्वावर काम करणारे समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. अमोल गावंडे, आशा स्वयंसेविका संगीता मसराम व अंगणवाडी सेविका सुनीता पुसनाके यांच्यावर कारवाई झाली.
मंगळवारी आरोग्य उपसंचालक डाॅ. राजकुमार चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचा जबाबही नोंदविण्यात आला. त्यानंतर भांबोरा केंद्राचा कारभार सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश मनवर व डाॅ. भूषण मसराम यांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. हरी पवार यांनी सांगितले.