दर दिवसाला एक कोटी लिटर पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:00 AM2020-02-27T06:00:00+5:302020-02-27T06:00:09+5:30

यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले आहे. यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर सर्वाधिक जबाबदारी येऊन ठेपली आहे. जीवन प्राधिकरणाने ३९ हजार नागरिकांना नळ जोडण्या दिल्या आहेत. यावरून दोन लाख ४० हजार नागरिकांची तहान भागविली जाते. या व्यतिरिक्त अतिरिक्त नळ जोडण्यासाठी तीन हजार नागरिकांनी अर्जांची उचल केली आहे.

One million liters of water leaks daily | दर दिवसाला एक कोटी लिटर पाण्याची गळती

दर दिवसाला एक कोटी लिटर पाण्याची गळती

Next
ठळक मुद्दे२५ कोटींची थकबाकी : ३९ हजारपैकी सहा हजार जोडण्या अनधिकृत, नगरपरिषदेकडे साडेपाच कोटी थकले

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जलसाठ्यामध्ये पाण्याचा थेंब न् थेंब साठविला जातो. त्याच पाण्याचे वितरण होताना यवतमाळात दररोज किमान एक कोटी लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. ठिकठिकाणी खोदकामामुळे पाईपलाईन जागोजागी फुटणे, अवैध नळ जोडण्या, सार्वजनिक ठिकाणी नळाला तोट्या नसणे, पाईपलाईन डॅमेज या प्रकारामुळे प्राधिकरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यातून प्राधिकरणाचे लाखोंचे नुकसान झाले. सामान्यांना मात्र पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले आहे. यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर सर्वाधिक जबाबदारी येऊन ठेपली आहे. जीवन प्राधिकरणाने ३९ हजार नागरिकांना नळ जोडण्या दिल्या आहेत. यावरून दोन लाख ४० हजार नागरिकांची तहान भागविली जाते. या व्यतिरिक्त अतिरिक्त नळ जोडण्यासाठी तीन हजार नागरिकांनी अर्जांची उचल केली आहे. त्या नळ जोडण्या प्रलंबित आहे.
शहराला दर दिवसाला तीन कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यातील ३० टक्के पाण्याची गळती होते. त्यात सर्वाधिक गळती पाईप फुटल्याने होत आहे. वितरित झालेल्या पाण्यापैकी एक कोटी लिटर पाणी गळतीच्या माध्यमातून वाहून जाते. यातून पाणी टंचाईसारख्या स्थितीचा अनेक प्रभागांना सामना करावा लागतो.
पाणी वितरण व्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी जीवन प्राधिकरणाकडे संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही व्यवस्था हाताळताना जीवन प्राधिकरणाला वर्षाकाठी ११ कोटी रूपयांचा खर्च येतो. यातील सहा कोटी ७५ लाख रूपयांचा निधी वीज बिलावर खर्च होतो. पाईपलाईनची दुरूस्ती आणि इतर कामासह वेतनावर इतर निधी खर्च होतो. यातून प्राधिकरणाचा गाडा चालत आहे. अशा स्थितीत शासकीय कार्यालय आणि सर्वसामान्य ग्राहकांकडे तब्बल २५ कोटी रूपयांचे पाणी बिल थकले आहे. त्यामध्ये टीबी हॉस्पिटल आणि नगरपरिषदेच्या थकबाकीचा समावेश आहे. नगरपरिषदेकडे सार्वजनीक नळ जोडण्यांचे तब्बल साडेपाच कोटी रूपयांचे पाणी बिल थकले आहे.
जीवन प्राधिकरणाची नवीन पाईपलाईन बसविताना अवैध नळ जोडण्या उघडकीस येत आहे. शहरात अशा तब्बल सहा हजार नळ जोडण्या अनधिकृत असल्याचे आत्तापर्यंत उघड झाले आहे. यापैकी साडेतीन हजार नळ जोडण्या नियमित करण्यात आल्या आहेत.

२२५ सार्वजनिक नळ जोडण्या बंद होणार
जीवन प्राधिकरणाचा संपूर्ण जोर नळ जोडण्यावर राहणार आहे. प्रत्येक नळ ग्राहकाकडून पाणी कर वसूल केला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणावरून हजारो लिटर पाणी वाया जाते. शहरात असे आणखी २२५ कनेक्शन आहेत. त्याला आता बंद केले जाणार आहे.

पाण्याचा मोठा अपव्यय, दुरुस्तीसाठी धावाधाव
शहरात प्राधिकरणाची पाईपलाईन बदलविण्याचे काम सुरू आहे. भूमिगत नाल्या आणि दूरसंचार विभाग व वीज वितरणच्या भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदकाम केले जात आहे. यामुळे ठिकठिकाणी पाईपलाईन फुटल्या आहे. यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. या दुरूस्तीसाठी प्राधिकरणाला दररोज धावाधाव करावी लागत आहे.

नागरिकांनी पाणी बिलाची थकबाकी भरावी
जनसामान्यांसह शासकीय शासकीय कार्यालयांनी थकबाकीचा भरणा करून प्राधिकरणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे. पाण्याचा अपव्यय करू नये. अनाधिकृत नळ जोडण्याधारकांनी त्या अधिकृत करवून घ्याव्यात.
- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण, यवतमाळ

नळ जोडणी करताना खोलीकरणाचे नियम
पाण्याच्या टाकीपासून मुख्य पाईपलाईन किती खोलवर असावी आणि पाईपलाईनपासून नळ जोडणी किती खोलवर असावी, याबाबत नियम आहे. तथापि नियम पाळलेच जात नाही. त्यामुळे वारंवार पाईपलाईन, नळ जोडण्या तुटतात. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.
- राजेश सावळे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक, जल तज्ज्ञ.

Web Title: One million liters of water leaks daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी