विषबाधित रुग्णांच्या उपचारासाठी नवीन प्रोटोकॉल, शासकीय रुग्णालयात विषबाधितांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 16:02 IST2017-10-06T16:02:45+5:302017-10-06T16:02:53+5:30
फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकरी, शेतमजुरांवर स्टॅन्डर्ड प्रोटोकॉल या नव्या पद्धतीने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली.

विषबाधित रुग्णांच्या उपचारासाठी नवीन प्रोटोकॉल, शासकीय रुग्णालयात विषबाधितांची भेट
यवतमाळ : फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकरी, शेतमजुरांवर स्टॅन्डर्ड प्रोटोकॉल या नव्या पद्धतीने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली. यासाठी शासनाने तशी अधिसूचना जारी केल्याचेही त्यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणा-या यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेटीसाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून विषबाधितांचा आढावा घेतला. आता रुग्णालयात विषबाधेचे २२ रुग्ण असून त्यापैकी चौघांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. गेल्या आठवड्यापासून विषबाधित रुग्णाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी आरोग्यमंत्र्यांपुढे केला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला. तसेच औषधीच्या उपलब्धतेची सद्यस्थिती जाणून घेतली. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, ट्रामाकेअर युनिट, उपजिल्हा रुग्णालय येथील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच पदभरती प्रक्रिया राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शासकीय आरोग्यसेवेत तज्ज्ञ डॉक्टर येण्यास इच्छूक नसतात. त्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या धर्तीवरच वेतन देण्याचा शासनस्तरावर प्रस्ताव आहे. डॉक्टरांनी मुख्यालयी राहावे, यासाठीसुद्धा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल राज्यमंत्री संंजय राठोड यांनी ग्रामीण रुग्णालय व ट्रामाकेअर युनिटच्या इमारतीचे काम अर्धवट असल्याचा मुद्दा आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिका-यांकडून सखोल माहिती आरोग्यमंत्र्यांनी घेतली. याच बैठकीत शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी रुग्णवाहिकेचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ बघता येथे १०८ रुग्णवाहिका कमी पडत असल्याचे सांगितले. रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यासाठी आपणही आग्रही असल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे मुंबई, पुण्यातील प्रमुख रेल्वेस्थानकावरच ४० पेक्षा अधिक रुग्णवाहिका आहेत. मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये सहा रुग्णवाहिका आहे. त्या तुलनेत यवतमाळात गरज असतानाही सुविधा नाही, यासाठी देखील शासनस्तरावर नवीन धोरण ठरविण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी मांडले. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी एएनएमची पदेसुद्धा लवकरच भरणार असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण बैठकीतच डॉक्टरांच्या शासकीय रुग्णालयातील उपस्थितीबाबत मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. अधिका-यांनी स्थिती सुधारण्याचे निर्देश दिले. यावेळी पालक सचिव व्ही. गिरीराज, आरोग्य विभागाचे आयुक्त, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.