विचारांची गरिबी गुलामगिरीला प्रोत्साहन देणारी
By Admin | Updated: December 6, 2015 02:30 IST2015-12-06T02:30:18+5:302015-12-06T02:30:18+5:30
एकवेळ आर्थिक गरिबी परवडली, परंतु समाजात विचारांची गरिबी असता कामा नये.

विचारांची गरिबी गुलामगिरीला प्रोत्साहन देणारी
सतीश पेंदाम : महात्मा जोतिबा फुले-बाबासाहेब आंबेडकर स्मृतिपर्व
यवतमाळ : एकवेळ आर्थिक गरिबी परवडली, परंतु समाजात विचारांची गरिबी असता कामा नये. विचारांची गरिबी गुलामगिरीला प्रोत्साहन देणारी असते, असे प्रतिपादन बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अभियंता सतीश पेंदाम यांनी येथे केले.
येथील आझाद मैदानावर आयोजित महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीपर्वात ते ‘क्रांतिवीर शामादादा कोलाम : आदिम स्वातंत्र समर’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यीक बाबाराव मडावी होते. पेंदाम म्हणाले, सुखवस्तू समाजाच्या विकासावर आज भर दिला जातो. जीवंत राहण्याची काळजी घेण्यापेक्षा मृत्यूनंतर काही लाख देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पुरस्कार देऊन आवाज बंद होणार असतील तर असे पुरस्कार नाकारले पाहिजे, असे ते म्हणाले. खरे क्रांतिकारी गुन्हेगार ठरले आणि गुन्हेगारांना क्रांतिकारक म्हणून गौरविले हा येथील इतिहास आहे. आदिवासींनी जल, जमीन आणि जंगल यासाठी १२२ वर्ष संघर्ष केला. शामादादाने ४० वर्ष लढा दिला. आज आदिवासी आणि बहुजन समाजाला विकासाबरोबरच न्यायहक्कासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विचारपीठावर रामचंद्र जंगले, पांडुरंग मसराम, बाळकृष्ण गेडाम, बी.डी. आडे, पांडुरंग व्यवहारे, नामदेव पेंदोरे, सुरेश सिडाम, प्रा.डॉ. अशोक कांबळे, किशोर उईके, किरण कुमरे, ताणीबाई आत्राम आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. काशिनाथ लाहोरे, माधुरी अंजीकर, प्रा.डॉ. अशोक कांबळे यांनी शामादादा कोलाम यांच्या जीवनावर वसंत कनाके लिखित पुस्तकावर समिक्षा केली. प्रास्ताविक बिरसा ब्रिगेड यवतमाळचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, संचालन रामचंद्र आत्राम आणि प्रेरणा कन्नाके यांनी तर आभार वसंत कन्नाके यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)