ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून; प्रेत खाणीच्या खड्ड्यात फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 14:33 IST2023-09-06T14:23:09+5:302023-09-06T14:33:08+5:30

मोहदा येथील घटना, शिरपूर पोलिस आरोपींच्या मागावर

Murder of a married woman by strangulation; The corpse was thrown into the mine pit | ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून; प्रेत खाणीच्या खड्ड्यात फेकले

ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून; प्रेत खाणीच्या खड्ड्यात फेकले

वणी (यवतमाळ) : एका २२ वर्षीय विवाहित महिलेचा खून करून तिचे प्रेत शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहदा येथील गिट्टी खाणीच्या खड्ड्यात फेकून दिल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणातील मारेकरी अद्याप निष्पन्न झाले नसले तरी शिरपूर पोलिस या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सरिता लालबाबू पंडित उर्फ सरिता राजन पंडित असे मृत महिलेचे नाव आहे. ती बिहार राज्यातील विसपट्टी येथील रहिवासी आहे. सध्या ती मोहदा येथील चंदनखेडे यांच्या गिट्टी क्रेशरवर काम करित होती. रविवारी रात्रीच्या सुमारास सरिताचा ओढणीने गळा आवळून तिचा खून करण्यात आला व नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला एका गुलाबी रंगाच्या साडीत बांधून तिचे प्रेत मोहदा शिवारातील एका बंद अवस्थेत असलेल्या खाणीच्या खड्ड्यातील पाण्यात फेकून दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तिची हत्या नेमकी कुणी केली, हे मात्र अद्याप उघडकीस आले नाही. मात्र, या प्रकरणातील मारेकऱ्यांना लवकरच अटक करू, असे शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

खानसामाने पटविली ओळख

मोहदा येथील गिट्टी खाणीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर कामाला आहेत. पाराशर यांच्या गिट्टी खाणीच्या बाजूला खाणीत काम करणारे मजूर वास्तव्याला आहेत. त्याठिकाणी जेवण बनविण्याचे काम करणारा दिनेश किशोर कापर (३२) याने मृत सरिताची ओळख पटविली.

Web Title: Murder of a married woman by strangulation; The corpse was thrown into the mine pit