Municipal councils overtake private schools and multiply schools | खासगी शाळांना मागे टाकत नगरपरिषद शाळेची पटसंख्येत भरारी
खासगी शाळांना मागे टाकत नगरपरिषद शाळेची पटसंख्येत भरारी

ठळक मुद्दे१८५५ विद्यार्थी दाखल : प्रवेशासाठी आणाव्या लागतात शिफारशी, शिक्षक, मुख्याध्यापकांच्या मेहनतीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा पटसंख्येविना बंद होत आहेत. तर दुसरीकडे काही शाळांनी मात्र दर्जेदार शिक्षणाचा पायंडा पाडून खासगी शाळांनाही मागे टाकले आहे. हाच आदर्श दारव्हा येथील नगरपरिषदेच्या शाळेने निर्माण केला आहे. गावात इंग्रजी माध्यमाच्या अनेक खासगी शाळा असूनही या नगरपरिषदेच्या शाळेत १८५५ इतक्या प्रचंड संख्येत विद्यार्थी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, राज्यभरातील नगरपरिषद शाळांमध्ये पटसंख्येच्या बाबतीत या शाळेचा दुसरा क्रमांक आहे.
नगरपरिषद शाळेत जाणारा विद्यार्थी म्हणजे, गरीब पालकाने नाईलाजाने पाठविलेला विद्यार्थी, असेच सार्वत्रिक चित्र आहे. पण दारव्ह्यात तसे नाही. येथील नगरपरिषद शाळा क्रमांक दोनमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळावा, यासाठी चक्क आमदारांकडूनही शिफारस आणली जात आहे. तरीही यंदा या शाळेचे प्रवेश ‘फुल्ल’ झाल्याने अनेकांना प्रतीक्षा यादीतच राहावे लागले. यवतमाळ जिल्ह्यात एकीकडे नगरपरिषदेच्या अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडत आहे. जिल्हा परिषदेच्या तर ८१ शाळा बंद करण्याचा आदेशच शिक्षण विभागाला काढावा लागला होता. मात्र दारव्ह्याच्या नगरपरिषद शाळेने या सर्वांवर मात केली आहे. गावातील सर्व शाळांना मागे टाकत येथे पहिली ते दहावीच्या वर्गात १८५५ विद्यार्थी दाखल झाले. शिवाय कितीतरी विद्यार्थ्यांना इच्छा असूनही येथे प्रवेश मिळू शकला नाही.
या शाळेची कीर्ती आता सर्वत्र पसरली असून नियोजन समितीमधून शाळेत भौतिक सुविधा वाढविण्यासाठी ५५ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

दरवर्षी स्पर्धा परीक्षा
ही नगरपरिषद शाळा दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीच्या धर्तीवर स्पर्धा परीक्षा घेते. त्यातून ४५० विद्यार्थ्यांचा दरवर्षी गौरव केला जातो. शाळा व्यवस्थापन समिती, नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे सहकार्य त्यासाठी लाभते. अभ्यासक्रमासोबतच सहशालेय उपक्रमांतून विद्यार्थी घडविले जात आहे. त्यामुळे खासगी शाळा टाळून पालक आपल्या मुलांना या नगरपरिषदेच्या शाळेत टाकत आहेत.

शनिवारी राज्यस्तरीय गौरव
दारव्ह्याच्या नगरपरिषद शाळेची दखल आता राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघातर्फे राज्यातील २० शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात पहिला पुरस्कार कराड तर दुसरा पुरस्कार दारव्हा येथील शाळेला जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्टेंबर रोजी आळंदी येथे होणार आहे. शिवाय मुख्याध्यापक रमेश राठोड यांनाही आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

मी २०१३ मध्ये या शाळेत रूजू झालो तेव्हा ५९४ इतका पट होता. आता १८५५ आहे. आम्ही नियोजनबद्ध काम केले. तासिका पद्धतीने अध्यापन केले जाते. सर्व वर्गात सेमी इंग्रजी आहे. आमच्या शाळेतील बहुतांश शिक्षक नेट-सेट झालेले आहेत. सर्वंकष गुणवत्तेवर भर असल्याने आमच्या शाळेचा पट वाढत आहे.
- रमेश राठोड, मुख्याध्यापक, नगरपरिषद शाळा, दारव्हा


Web Title: Municipal councils overtake private schools and multiply schools
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.