अल्पवयीन कार चालकाने नागपूरच्या इसमाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:22 IST2018-11-11T22:22:10+5:302018-11-11T22:22:48+5:30
दर्डानगर परिसरात रात्री १०.३० च्या सुमारास शतपावली करीत असताना एका अल्पवयीन कारचालकाने जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला. कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉड्रीच्या टपरीवर आदळली. हा थरार शनिवारी रात्री घडला.

अल्पवयीन कार चालकाने नागपूरच्या इसमाला चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दर्डानगर परिसरात रात्री १०.३० च्या सुमारास शतपावली करीत असताना एका अल्पवयीन कारचालकाने जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला. कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉड्रीच्या टपरीवर आदळली. हा थरार शनिवारी रात्री घडला.
राजेंद्र प्रभाकर चांदे (५०) रा. बजाजनगर नागपूर असे या अपघातातील मृताचे नाव आहे. येथील श्रीकृष्ण सोसायटीतील अल्पवयीन कारचालक एम.एच. २९ ए आर ००१३ ही कार घेऊन मित्रासह सुसाट वेगाने दारव्हा नाक्याकडून पुष्पकुंज सोसायटीकडे जात होता. दरम्यान राजेंद्र चांदे हे पायदळ रस्त्याचे कडेने जात होते. त्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर धडकून एका टपरीवर आदळली. चांदे यांच्या सोबत असलेल्यांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री उशिरा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अमित चंद्रकांत ओक रा. दर्डानगर यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात त्या कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविणे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पालकाकडून मुलांचे फाजील लाड
शहरात अनेक अल्पवयीनाच्या हाती वाहने सोपविली जात आहे. नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलाने अपघात केल्यास त्याच्या वडिलांना अथवा पालकांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. कठोर कारवाई होत नसल्याने या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे.