आजोळ टंचाईमुक्त व्हावं म्हणून
By Admin | Updated: May 15, 2017 00:55 IST2017-05-15T00:55:39+5:302017-05-15T00:55:39+5:30
आजोबाचे गाव ‘जीवन’ समृध्द व्हावे म्हणून वरिष्ठ अधिकारी असलेला नातू चक्क सुट्या टाकून सहकुटुंब दाखल झाला.

आजोळ टंचाईमुक्त व्हावं म्हणून
अधिकाऱ्याचे कुटुंब गावात : राळेगावातील चहांदमध्ये ‘वॉटर कप’साठी धडपड, ग्रामस्थांची साथ
राजेश जवादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चहांद : आजोबाचे गाव ‘जीवन’ समृध्द व्हावे म्हणून वरिष्ठ अधिकारी असलेला नातू चक्क सुट्या टाकून सहकुटुंब दाखल झाला. हातात कुदळ-पावडे घेऊन कामालाही लागला. अन् पाहता पाहता अख्ख्या गावाची साथ मिळाली. आजोबांच्या गावातील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल थांबावे, म्हणून चालविलेली नातवाची धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे.
राळेगाव तालुक्यातील चहांद या गावाला प्रत्येक उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. घरातील चिल्यापिल्यांना घेऊन महिला मंडळीची पाण्यासाठी दोन ते तीन महिने पायपीट सुरू असते. पाण्यासाठीचा टाहो थांबावा यासाठी हे गाव सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहे. या गावातील काही युवकांनी स्पर्धेसाठीचे प्रशिक्षणही घेतले. मात्र स्पर्धेच्या दृष्टीने तेवढी गती आलेली नव्हती. पण या गावाशी नाळ जुळून असलेल्या एका अधिकाऱ्याने हाती कुदळ पावडे घेतले. अख्खे गाव श्रमदानात सहभागी झाले आहे.
औरंगाबाद येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ.सचिन शंकरराव मडावी यांनी चहांदला टंचाईमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. चहांद हे त्यांचे आजोळ असून त्यांच्या वडिलांचे आठवीपर्यंतचे शिक्षण याच गावात झाले आहे. ते सेवानिवृत्त तहसीलदार आहेत. आजोबाचे गाव टंचाईग्रस्त आहे आणि स्पर्धेतही मागे राहू नये म्हणून डॉ.सचिन मडावी हे येथे दाखल झाले आहे. २२ मे पर्यंत त्यांनी सुट्या टाकल्या आहेत. सोबत पत्नी डॉ.प्रियंका आणि परिवारातील सदस्यही आहेत. डॉ. सचिन मडावी गावात दाखल झाल्यापासून त्यांनी गावकऱ्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले. टंचाईतून मुक्तीसाठी ही स्पर्धा किती महत्वाची आहे, हे सांगितले. प्रोजेक्टरवर माहिती दिली. पाहुणे म्हणून नव्हे तर चहांद पाण्याचे समृध्द व्हावे म्हणून आलेल्या मडावी कुटुंबातील सदस्यांनी श्रमदानात सहभागही नोंदविला. आजोबाचे गाव टंचाईमुक्त व्हावे, यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे.
दरम्यान, आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर आदींनी या गावात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. श्रमदानात सहभागी झालेल्या लोकांना आवश्यक त्या सूचना केल्या. पाण्याचे महत्त्व या अधिकाऱ्यांनी पटवून देतानाच त्यासाठी उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत.