मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:14 IST2025-12-30T07:12:49+5:302025-12-30T07:14:35+5:30
उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील घटना...

मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
उमरखेड (जि. यवतमाळ) : उपजिल्हा रुग्णालयातील मोफत डायलिसिस सेवा केंद्रात सोमवारी दुपारी दीड वाजता शाॅर्टसर्किट झाल्याने खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत खिडकीची काच फाेडून आठ रुग्णांना बाहेर काढून त्यांचे जीव वाचविले, तर काही कर्मचाऱ्यांनी फायर सिलिंडरने शाॅर्टसर्किटवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.
शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात उमरखेड-महागाव तालुक्यातील रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी मोफत केंद्र उघडण्यात आले आहे. साेमवारी दुपारी अचानक फटाक्यासारखा आवाज होऊन शॉर्टसर्किटमुळे डायलिसिस केंद्र धुराने घेरले गेले. आरडाओरड करणाऱ्या रुग्णांना कर्मचाऱ्यांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढले. सुदैवाने यात जीवितहानी अथवा कुणीही गंभीर जखमी झाले नाही.
सगळीकडे धूरच धूर
डायलिसिस केंद्र धुराने घेरले गेले. आरडाओरड करणाऱ्या रुग्णांना बाहेर काढण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना खिडकीच्या काचा फोडल्या. वीज वितरण कंपनीला फोन लावून वीजपुरवठा बंद केला. रूग्णांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर रुग्णांवर बाहेर उपचार करण्यात आले
मागील अनेक दिवसांपासून वीज ये-जा, हायव्होल्टेज व लो व्होल्टेजचा प्रकार सुरू आहे. जनरेटर उपलब्ध असतानाही कंपनीकडून त्याचा नियमित वापर केला जात नसल्याचे सांगण्यात येते.
डॉ. एस. पी. डांगे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, उमरखेड
डाॅक्टरविनाच सुरू आहे उपचार केंद्र
राज्यात एचएलएल कंपनीमार्फत मोफत डायलिसिस केंद्र राज्य सरकार चालवीत आहे. या केंद्रात डॉक्टरची नेमणूक करण्याची जबाबदारी ही कंपनीची आहे. मात्र, येथील डायलिसिस केंद्र सुरू होऊन सहा महिने झाले येथे डॉक्टरची नियुक्ती केली नसल्याची गंभीर बाबत यानिमित्ताने समोर आली आहे.
शॉर्टसर्किटने सतत फटाक्यासारखा आवाज येत होता. धुरामुळे नेमकी आग समजून येत नव्हती. तरीही कर्तव्यावर असणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांनी भांबावून न जाता प्रसंगावधान दाखवून उपचार घेत असलेल्या आठ रुग्णांना सुखरूप बाहेर काढले.