इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 14:00 IST2022-10-19T13:56:33+5:302022-10-19T14:00:59+5:30
७२ हजार रुपये उकळले

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार
यवतमाळ : इन्स्टाग्रामवर युवकाशी मैत्री करणे विवाहित महिलेला चांगलेच महागात पडले. सुरुवातीला मित्र म्हणून जवळ येणाऱ्या नराधमाने महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केला, नंतर तिला धमकावत तिच्याकडून वारंवार पैसे व सोने वसूल केले. ही घटना यवतमाळातील लोहारा परिसरात घडली.
आरोपी परिक्षित माणिकराव सोनोने (२८) याने इन्स्टाग्रामवरून विवाहितेशी मैत्री केली. हळूहळू ओळख वाढविली. महिलेचे घरी येऊन काही फोटो काढले. हे फोटो त्या विवाहितेच्या पतीला दाखविण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. नंतर पैशासाठी तगादा लावला.
पहिल्यांदा दहा हजार, नंतर बारा हजार ऑनलाइनद्वारे घेतले. नंतर २२ हजार रुपये रोख नेले. दहा ग्रॅम सोन्याची चेन घेतली. आरोपीकडून सतत छळ होत असल्याने महिलेने याची आपबिती पतीला सांगितली. अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी परिक्षित सोनोने याच्यावर कलम ३७६, ३८४, ३८८ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.