पैनगंगा अभयारण्याच्या पर्यटनाकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: May 13, 2016 02:36 IST2016-05-13T02:36:00+5:302016-05-13T02:36:00+5:30

निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या पैनगंगा अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्याची ताकद असली तरी दुर्लक्षित धोरणामुळे आज पर्यटकांनी पाठ फिरविली आहे.

Ignore the tour of Penganga Wildlife Sanctuary | पैनगंगा अभयारण्याच्या पर्यटनाकडे दुर्लक्ष

पैनगंगा अभयारण्याच्या पर्यटनाकडे दुर्लक्ष

सुविधांचा अभाव : वन्यजीव विभागही उदासीन, टिपेश्वरमध्ये गर्दी; पैनगंगेकडे पाठ
उमरखेड : निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या पैनगंगा अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्याची ताकद असली तरी दुर्लक्षित धोरणामुळे आज पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. उलट अलिकडेच निर्माण झालेल्या टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांच्या रांगा लागल्या आहे. वन्यजीव विभागाची उदासीनता आणि सुविधांचा अभाव यामुळे पर्यटक पैनगंगा अभयारण्यात येतच नाही.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा अभयारण्य आहे. ३२४.६४ चौरस किलोमीटर परिसरात अभयारण्य वसलेले आहे. या अभयारण्यात हिंस्त्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. घनदाट जंगलात निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पैनगंगा अभयारण्य पर्यटकांना खुनावते. याठिकाणी जिल्ह्याचा मानबिंदू सहस्त्रकुंड धबधबा आहे. तसेच दुधारी नावाचे प्रेक्षणिय स्थळही आहे. अभिजात सौंदर्याने नटलेला हा परिसर पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी ठरू शकतो. परंतु पावसाळ््यात धबधब्याचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी स्थानिक पर्यटक येथे येतात.
पैनगंगा अभयारण्यात जाण्यासाठी रस्ते नाही, खाचखळग्याच्या रस्त्यावरून एकदा गेल्यानंतर दुसऱ्यांदा जाण्याची कुणाची हिंमत होत नाही. अभयारण्यात पर्यटकांना राहण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. सहस्त्रकुंड धबधब्यावरही कोणत्याही सुविधा नाही. या कारणांमुळे पर्यटक पैनगंगा अभयारण्याकडे पाठ फिरवितात. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातीलच टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. तेथील वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. उलट पैनगंगा अभयारण्यात तसेच प्रयत्न होताना दिसत नाही. जंगल सफारीसाठी पर्यटक आल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना असते. त्यामुळेच या परिसरात कुणालाही फिरकू दिले जात नाही. पैनगंगा अभयारण्याचा पर्यटनासाठी उपयोग व्हावा, यासाठी जिल्हास्तरावरही प्रयत्नांची गरज आहे. जंगल सफारीसाठी वाहनांची व्यवस्था, गाईड आदी सुविधा निर्माण करण्यासोबतच या परिसरात पर्यटकांना राहण्यासाठी सुसज्ज निवासस्थांनाची गरज आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Ignore the tour of Penganga Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.