वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला? नायगाव शिवारात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:45 IST2025-12-20T17:43:52+5:302025-12-20T17:45:08+5:30
Yavatmal : वणी तालुक्यातील नायगाव कोळसा खाण परिसरात नवीन पेट्रोलपंपाच्या समोरील पडीत जमिनीवरील झुडुपात एक वाघ मृतावस्थेत पडून असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले.

How exactly did the tiger die? Body found in Naigaon Shivara
वणी (यवतमाळ) : वणी ते घुग्गूस मार्गावरील नायगाव शिवारात बेलोरा बसथांब्या समोरील रस्त्यालगतच्या झुडुपात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबतचे गुढ अद्याप कायम आहे.
वणी तालुक्यातील नायगाव कोळसा खाण परिसरात नवीन पेट्रोलपंपाच्या समोरील पडीत जमिनीवरील झुडुपात एक वाघ मृतावस्थेत पडून असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. यासंदर्भात पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर, वणीच्या सहाय्यक वनसंरक्षक संगीता कोकणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुजाता विरकर व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली. यावेळी मृत वाघाला पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. काही वेळानंतर यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ.किशोर मानकर, पांढरकवडाचे उपवनसंरक्षक यशवंत बहाळे, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी (रोहयो) वंदना धांडे, मानद व वन्यजीवरक्षक रमजान विराणी हेदेखिल घटनास्थळी दाखल झाले. या सर्व अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर वाघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. शवविच्छेदनानंतर शनिवारी दुपारी वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वाघाच्या मृत्यूचा तपास सहाय्यक वनसंरक्षक संगीता काेकणे व वनपरिक्षेत्र अधिकारी सुजाता विरकर करित आहेत.
तीन वर्षांपासून वाघाचा वावर
गेल्या तीन वर्षांपासून शिंदोला सिमेंट माईन्स, मुंगोली, कोलगाव, निलजई कोळसा खाण परिसरात पट्टेदार वाघांचा वावर असल्याचे अनेकदा दिसून आले. निलजई येथील कोळसा खाण परिसरात डिसेंबर २०२२ मध्ये केशवराव नांदे या कामगारावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून कोळसा खाण परिसरात, शेतात अनेकांना पट्टेदार वाघ आढळून येत आहेत. तथापि, वाघाने मानवांवर हल्ला चढविल्याच्या घटना घडल्या नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा खाण कामगार, शेतकरी, शेतमजुरात वाघाची भीती निर्माण झाली आहे.