दमदार पावसाने पेरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:05 PM2018-06-10T22:05:24+5:302018-06-10T22:05:24+5:30

गतवर्षी अपुऱ्या पावसाने कर्जाच्या खाईत गेलेल्या शेतकऱ्यांना यंदा मृगनक्षत्रापासूनच पावसाने दिलासा दिला. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे.

Heavy rains start sowing | दमदार पावसाने पेरणी सुरू

दमदार पावसाने पेरणी सुरू

Next
ठळक मुद्दे२४ तासात २२.८१ मिमी : दहा दिवसात ८९.८१ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गतवर्षी अपुऱ्या पावसाने कर्जाच्या खाईत गेलेल्या शेतकऱ्यांना यंदा मृगनक्षत्रापासूनच पावसाने दिलासा दिला. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. गत दहा दिवसात ८९.८१ मिमी पाऊस झाला असून २४ तासात २२.८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील शेतशिवार आता शेतकरी आणि मजुरांच्या गर्दीने फुलून गेले आहे.
गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्केच पाऊस झाला होता. यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला. यंदा सुरुवातीपासूनच हवामान खात्याने समाधानकारक अंदाज वर्तविले. विशेष म्हणजे अंदाज खरे ठरत पावसाचे वेळेवर आगमन झाले. मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दररोज रात्री पाऊस धो-धो बरसत आहे. १ ते १० जूनपर्यंत जिल्ह्यात ८९.८१ मिमी पाऊस कोसळला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत केवळ ४४.६४ टक्के पाऊस कोसळला होता. आतापर्यंत कोसळलेला पाऊस वार्षिक सरासरीच्या १०.१८ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस दारव्हा तालुक्यात १६२ मिमी कोसळला. यवतमाळ ११७ मिमी, बाभूळगाव ६५ मिमी, कळंब ४० मिमी, आर्णी ८९ मिमी, दिग्रस १०७ मिमी, नेर ९५ मिमी, पुसद १५२ मिमी, उमरखेड ७८ मिमी, महागाव १०७ मिमी, केळापूर ७० मिमी, घाटंजी १३३ मिमी, राळेगाव ४१ मिमी, वणी ७८ मिमी, मारेगाव ४१ मिमी, झरी ६२ मिमी पाऊस कोसळला आहे. दहा दिवसात झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. कापूस टोबणीला शेतशिवारात प्रारंभ झाला आहे. शेतशिवार शेतकरी आणि मजुरांच्या गर्दीने फुलून गेले आहे.
पेरणीची घाई करू नका
जिल्ह्यात सध्या कोसळत असलेला पाऊस मान्सूनपूर्व आहे. त्यातच १२ जूननंतर पावसात खंड पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तापमानातही वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, असेही म्हटले आहे.
पाणीटंचाईत पावसाचा दिलासा
यवतमाळ शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यवतमाळ शहराने तर अभूतपूर्व पाणीटंचाई अनुभवली. दमदार पाऊस कोसळल्याने पाणीटंचाई संपली नसली तरी दिलासा मात्र मिळाला आहे. शहरातील अनेक विहिरी आणि हातपंप व बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी उपलब्ध होत आहे. काही ठिकाणी नागरिक छतावरून पडणारे पाणी गोळा करून आपली पाण्याची गरज भागवित असल्याचे चित्र यवतमाळ शहरात आहे.

Web Title: Heavy rains start sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस