व्याजाच्या पैशातून केला त्याचा खून ! दोन घटनांनी पुसद शहर हादरले ; तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:47 IST2025-11-11T19:39:22+5:302025-11-11T19:47:22+5:30
Yavatmal : शहरातील वसंतनगर परिसरात हैदर पार्क येथे व्याजाच्या पैशावरून रविवारी रात्री ९ वाजता वाद झाला. दोघांनी चाकूहल्ला करून एकाचा खून केला तर दुसरा गंभीर जखमी आहे.

He was murdered for loan ! Two incidents shook Pusad city; Three people injured
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरातील वसंतनगर परिसरात हैदर पार्क येथे व्याजाच्या पैशावरून रविवारी रात्री ९ वाजता वाद झाला. दोघांनी चाकूहल्ला करून एकाचा खून केला तर दुसरा गंभीर जखमी आहे. तर दुसरी घटना सोमवारी सकाळी १० वाजता पुसद शहर परिसरात घडली. तेथे छेडखानीवरून वाद पेटल्याने एकाने चाकूचे वार करून दोघांना गंभीर जखमी केले. या दोन्ही घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
हैदर पार्क येथे रविवारी रात्री ९:३० वाजता शेख आवेज ऊर्फ क्रश शेख बब्बू (१९, रा. रहेमतनगर), शेख तैहरिम ऊर्फ शिपू शेख अकबर (१८, रा. नसीम मशीदजवळ) व एक विधीसंघर्ष बालक या तिघांचा पानटपरीवर शेख सोहेलोद्दीन व त्याचा मित्र शेख मुफ्लिस यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर सोहेल व मुफ्लिस हे दोघे शेकोटीवर येऊन बसले. त्याच दरम्यान शेख आवेज हा दोन मित्रांना सोबत घेऊन तेथे पोहोचला. पुन्हा वाद पेटला, यात तिघांनी शेख सोहेलोद्दिन याच्या छातीवर, मानेवर, पोटावर चाकूने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर शेख मुफ्लिस हा गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर तिन्ही आरोपी खंडळा जंगल परिसरात पळून गेले. दरम्यान, जखमी मुफ्लिस याला पुढील उपचारार्थ नांदेड येथे रेफर करण्यात आले. या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. वसंतनगर पोलिसांनी रविवारी रात्रीच शोध मोहीम राबवून शेख आवेज व विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. मुख्य आरोपी शेख तैहरिम ऊर्फ शिपू शेख अकबर हा अद्याप फरार आहे. वसंतनगर ठाणेदार सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुगत पुंडगे, उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, जमादार आनंदा चांदेवाड, सुरेश राठोड आरोपींचा शोध घेत आहे.
३ जण दोन घटनांमध्ये झाले जखमी
पुसद शहरात रविवारी रात्री व सोमवारी सकाळी चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या. यात एकाचा जीव गेला तर तिघे गंभीर जखमी झाले आहे.
चाकूहल्ला करून आरोपी पोहोचला पोलिस ठाण्यात
पुसद शहर पोलिस ठाणे परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ महिलेच्या छेडखानीवरून सोमवारी सकाळी १० वाजता चाकूने भोसकून दोघांना जखमी करण्यात आले. आरोपी गजानन भगवान नाळे (४०, रा. बालाजी वॉर्ड) याने अंकुश शिवाजी दळवे (२६, रा. पार्डी - निंबी) याच्या मानेवर, पाठीवर चाकूचे वार केले. तर वाद सोडविण्यास आलेल्या यश संजय केवटे (१८, रा. पार्डी) यालाही चाकू लागल्याने तो जखमी झाला. दोघांवरही पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गजानन भगवान नाळे यांनी स्वतः शहर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली. प्रभारी ठाणेदार प्रेमकुमार केदार यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.