वनरक्षक, लेखापाल एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:12 IST2019-07-10T22:09:52+5:302019-07-10T22:12:12+5:30
वन विभागातील कर्मचाऱ्याला वेतनाची रक्कम काढून दिल्याबद्दल पाच हजारांची लाच मागितली. यातील लाचखोर लेखापाल व वनरक्षक दोघांना एसीबी पथकाने उमरखेड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात बुधवारी रंगेहात अटक केली.

वनरक्षक, लेखापाल एसीबीच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वन विभागातील कर्मचाऱ्याला वेतनाची रक्कम काढून दिल्याबद्दल पाच हजारांची लाच मागितली. यातील लाचखोर लेखापाल व वनरक्षक दोघांना एसीबी पथकाने उमरखेड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात बुधवारी रंगेहात अटक केली.
लेखापाल अरविंद रामराव आगलावे (४१), वनरक्षक संजय सुदामराव ठाकरे (५३) अशी लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी कार्यालयातीलच कर्मचाऱ्याला मार्च ते मे २०१९ या कालावधीतील वेतन काढून देण्याबद्दल पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार एसीबीच्या यवतमाळ कार्यालयाकडे कर्मचाऱ्याने केली. त्यावरून ९ जुलै रोजी एसीबीने पडताळणी केली.
बुधवारी दुपारी पाच हजारांपैकी तीन हजार रुपये रक्कम लेखापाल व वनरक्षकाने स्वीकारली. यावेळी एसीबीचे पथक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातच होते. रक्कम स्वीकारताच दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे, पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे, सुरेंद्र जगदाळे, अनिल ठाकूर, किरण खेडकर, महेश वाकोडे, सचिन भोयर, वसीम शेख, राहूल गेडाम यांनी केली.