दोन दिवसांपासून धुमसतेय करकडोह शिवारातील जंगल, यंत्रणेचे प्रयत्न विफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST2022-04-03T05:00:00+5:302022-04-03T05:00:19+5:30
वणवा नियंत्रणासाठी थेट सॅटेलाइटवरून लक्ष ठेवले जाते. २४ तास वन कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. दर दोन तासाने वणव्याबाबतचा अलर्ट दिला जातो. तसा अहवाल काढण्यात येतो. असे असले तरी एकदा आग जंगलात भडकली, तिला नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सध्या ब्लोअर मशीनच्या माध्यमातून वन विभागाची यंत्रणा आग नियंत्रणाचा प्रयत्न करते.

दोन दिवसांपासून धुमसतेय करकडोह शिवारातील जंगल, यंत्रणेचे प्रयत्न विफल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उन्हाचा पारा भडकताच शहरासह जिल्ह्यात आगीच्या घटनाही सातत्याने वाढत आहेत. शहरालगतच्या जंगली भागात वणव्याने पेट घेतला. वन विभागाची यंत्रणा अलर्ट असल्याने घटनास्थळी पोहोचली. आग विझविण्याचा प्रयत्न केला. मदतीला नगरपालिकेचे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, चार दिवसांपूर्वी विझलेला वणवा शनिवारी दुपारी पुन्हा भडकला.
वणवा नियंत्रणासाठी थेट सॅटेलाइटवरून लक्ष ठेवले जाते. २४ तास वन कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. दर दोन तासाने वणव्याबाबतचा अलर्ट दिला जातो. तसा अहवाल काढण्यात येतो. असे असले तरी एकदा आग जंगलात भडकली, तिला नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सध्या ब्लोअर मशीनच्या माध्यमातून वन विभागाची यंत्रणा आग नियंत्रणाचा प्रयत्न करते. जंगलात पालापाचोळा भरपूर पडून असल्याने कुठल्याही कारणाने वणवा भडकू शकतो. साधारणत: शेतकरी उन्हाळ्यात मशागतीपूर्वी धुऱ्यावरील काडीकचरा पेटवून स्वच्छ करतात. यातूनही वणवा लागण्याची भीती असते.
चार दिवसांपूर्वी करकडोह शिवारात वन विकास महामंडळ व वन विभागाच्या जंगलात आग लागली. ती नियंत्रणात आली. शनिवारी पुन्हा ही आग पसरायला लागली. नियंत्रणासाठी अग्निशमन बंब बोलाविण्यात आले. तोपर्यंत आग शेतात पोहोचली हाेती.
शेतीउपयोगी ६० हजारांचे साहित्य जळून खाक
- करकडोह पोड येथील धर्माजी कुंभेकार यांच्या गावठाणाजवळील शेतात वणवा पोहोचला. आगीने शेतातील गोठ्याला कवेत घेतले. गुरांसाठी साठविलेले कुटार जळून खाक झाले. याशिवाय औतभांडी, तुषार संचही जळाले. तब्बल ६० हजारांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी नगरसेवक विजय खडसे यांनी अग्निशमन विभागाशी संपर्क केला. घटनास्थळी तलाठी कुरसंगे यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.