नंदिनी नीलेश पारवेकर : माणिकराव ठाकरेंवर डागली तोफयवतमाळ : आमदार नीलेश पारवेकरांचे विकासाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघ्या १८ महिन्यापूर्वी मी राजकारणात आले. जनतेनेही साथ दिली. त्यांच्या विश्वासाला तडा न जावू देता मतदारसंघात विकासाची कामे केली. मात्र तिकिट वाटपात विकासापेक्षा पुत्रप्रेम भारी पडले. अगदी वेळेवर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपल्या मुलासाठी माझे तिकिट कापले. एका अर्थाने यवतमाळकर जनतेला विकासापासून दूर तर नेलेच. मलाही राजकीय बहिष्कृत करण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप नंदिनी नीलेश पारवेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. यवतमाळचे आमदार नीलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास टाकून काँग्रेसची तिकिट दिली. जनतेनेही साथ दिली. अवघ्या १८ महिन्यात मी विकासाचा झंझावात सुरू केला. माझे पती नीलेश पारवेकरांचे विकासाचे स्वप्न मला पूर्ण करायचे होते. परंतु माझे तिकिट कापून निलेश पारवेकरांच्या स्वप्नांनाच मूठमाती देण्याचा प्रयत्न चालविला आहे. सुरुवातीपासूनच माझी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. माझ्या तिकिटासाठी खासदार विजय दर्डा, शिवराज पाटील चाकुरकर, जितेंद्र सिंग यांनी अतोनात प्रयत्न केले. मला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही भक्कम पाठबळ मिळाले. त्यामुळे मलाच तिकिट मिळणार हे निश्चित होते. २७ सप्टेंबर रोजी दिल्लीत माझे तिकिटही पक्के झाले. तसा एबी फॉर्म राज्यातील नेत्यांकडे पाठविण्यात आला. मात्र या दरम्यान प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विश्वासघाताचे राजकारण केले. (कार्यालय प्रतिनिधी)
विकासापेक्षा पुत्रप्रेम पडले भारी
By admin | Updated: October 12, 2014 23:37 IST