फेसबुकवर जाहिरात बघितली, ऑनलाईन व्यवहार केला आणि ३ लाखांनी फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 16:29 IST2021-11-24T16:18:16+5:302021-11-24T16:29:21+5:30
सूरजने फेसबुकवर जाहिरात पाहून स्वस्तातील चांगल्या दर्जाच्या मक्यासाठी संपर्क केला. बॅंक खात्यात तीन लाख रुपये जमा केले. त्यानंतर, काही दिवस वाट पाहिली. मात्र मका काही आलाच नाही व पैसेही गेले.

फेसबुकवर जाहिरात बघितली, ऑनलाईन व्यवहार केला आणि ३ लाखांनी फसला
यवतमाळ : तालुक्यातील मांगुळ येथील शेतकऱ्याने स्वस्तात चांगल्या दर्जाचा मका मिळतो म्हणून ऑनलाईन व्यवहार केला. फेसबुकवर आलेली मक्याची जाहिरात पाहून संबंधिताला संपर्क केला. इतकेच नाही, तर त्याच्या खात्यात २० टन मक्यासाठी तीन लाख रुपये जमा केले. मात्र मकाही आला नाही व पैसेही परत मिळाले नाहीत.
सूरज रामेश्वर गावंडे (३०, रा. मांगुळ) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सूरजने फेसबुकवर जाहिरात पाहून स्वस्तातील चांगल्या दर्जाच्या मक्यासाठी संपर्क केला. त्याने अभिषेक शर्मा (३५, रा. गुंजउजैन मध्य प्रदेश) याच्याशी संपर्क केला. अभिषेकने मागणी केल्याप्रमाणे सूरजने त्याच्या बॅंक खात्यात तीन लाख रुपये जमा केले. ८ नोव्हेंबरला पैसे जमा केल्यानंतर सूरजने काही दिवस वाट पाहिली. मात्र मका काही आलाच नाही.
अखेर त्याने अभिषेकशी संपर्क करून, मका नसेल तर पैसे परत करा, अशी विनंती केली. मात्र अभिषेकने केवळ आश्वासन दिले, पैसे परत केले नाहीत. वारंवार संपर्क केला असता, नंतर तो क्रमांक बंद येऊ लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सूरज गावंडे याने सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणात यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.