रुपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सुशिक्षीत बेरोजगारांना मोठ्या शहराकडे रोजगारासाठी जाण्याचे कामच पडू नये म्हणून यवतमाळात औद्योगिक वसाहत उभारण्यात आली. तब्बल ६४५ हेक्टरवर असलेल्या या वसाहतीत मोजकेच उद्योग सुरू आहेत. त्यातील दोन मोठे उद्योग सोडले तर इतर उद्योगात केवळ तीन ते चार हजार बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. दररोज अनेक बेरोजगार तरुण औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधासाठी येतात. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते.
जुनी औद्योगिक वसाहत २०५ हेक्टरवर उभारलेली आहे. ही जागा अपुरी पडल्याने अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी ४३९ हेक्टरवरील जागा नव्याने मंजूर झाली. अशा ६४५.५६ हेक्टरवर ही औद्योगिक वसाहत उभी आहे. यावर २५२ युनिट आहेत. त्यातील अर्धे अधिक युनिट बंद आहेत. अर्धे युनिट सुरू असले तरी रेमंड आणि सुतगिरणी हे मोठे प्रकल्प वगळल्यास रोजगाराचे अपेक्षित उद्दिष्ठ गाठण्यास ही वसाहत अपयशी ठरल्याचे दिसते.
जिनिंग प्रेसिंग, ऑइल मिल, दालमिल, कार्डबोर्ड, ट्रान्सफार्मर फॅक्टरी, प्लास्टिक कॅरी फॅक्टरी, फरसाण युनिट, डेअरी युनिट, मुरमुरा युनिट, एचडीपीई पाइप, पीव्हीसी पाइप, फ्लाय अॅश ब्रिक फॅक्टरी, कृषी अवजारे आणि स्पिनिंग मिल या ठिकाणी साधारण चार हजार कर्मचारी काम करीत असून त्यात महिला कामगारांचे प्रमाण २० टक्के आहे.
या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण अनेकवेळा काम न मिळाल्याने परततात. उच्च शिक्षित तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम मिळत नाही. मोजक्याच उच्च शिक्षित तरुणांना या ठिकाणी काम मिळाले आहे. मात्र, लाखावर उच्च शिक्षित तरुण आजही कामाच्या प्रतीक्षेत आहे. शहरासह लगतच्या गावातील आणि जिल्ह्यातील इतर भागातून आलेले तरुण या ठिकाणी रोजगार लेबर वर्क म्हणून काम करतात. त्यांना ३०० ते ६०० रुपयापर्यंतचा रोजगार मिळतो. काही सुशिक्षित बेरोजगार उधडे काम घेतात. मात्र, हे कामदेखील हंगामी असते. यातून हंगाम संपल्यावर अनेकांच्या हातचा रोजगार जातो. त्यांना पुन्हा दूसऱ्या कामाचा शोध घ्यावा लागतो.
तरुण म्हणतात... "मजुरांच्या मजुरीचे दर कमी आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर मोठे उद्योग आवश्यक आहेत. आम्ही कुठेही काम करण्यासाठी तयार आहोत. स्थानिक पातळीवर मोठे उद्योग आले तर त्याचा लाभ होईल. स्किलनुसार रोजगार मिळेल." - शेख अनिस
"मी आयटीआय केला. मात्र, या ठिकाणी लेथ मशिनवरचे काम उपलब्ध नाही. यामुळे मिळेल ते काम करून रोजगार मिळवितो. अनेक आयटीआय झालेले तरुण रोजगाराच्या शोधात बाहेर जातात. या ठिकाणी रोजगार मिळाला तर प्रत्येकाला फायदा हाईल." - वसंत भारकर
"मी आयटीआयमधून शिक्षण केले, रोजगार मिळावा, हा मुख्य उद्देश होता. मात्र, स्थानिक पातळीवर काम नाही. मोठ्या शहरात राहण्याचा आणि जेवणाचा खर्च वाढतो. यामुळे याच ठिकाणी काम करीत आहे. माझ्या बॅचचे अनेक तरुण रोजगार न मिळाल्याने बाहेर जिल्ह्यात गेले आहेत." - जीवन चव्हाण
"आता कापसाचा हंगाम आहे. म्हणून उधडे काम आम्ही घेतो. यात कामानुसार पैसे असतात. अशा स्वरुपाचे काम बारमाही उपलब्ध राहिले तर त्याचा कामगारांना फायदा होतो. यासाठी नवे उद्योग यायला हवेत." - लक्ष्मण पत्रे