विदेशातून आलेले आठ नागरिक यवतमाळात क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:44 IST2020-05-16T14:43:53+5:302020-05-16T14:44:11+5:30
विविध उद्देशाने लंडन, फिलीपाईन्स येथे राहणारे आठ नागरिक लॉकडाऊनमुळे आपल्या गावी यवतमाळ जिल्ह्यात परतले. त्यांना यवतमाळातील एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यात दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

विदेशातून आलेले आठ नागरिक यवतमाळात क्वारंटाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विविध उद्देशाने लंडन, फिलीपाईन्स येथे राहणारे आठ नागरिक लॉकडाऊनमुळे आपल्या गावी यवतमाळ जिल्ह्यात परतले. त्यांना यवतमाळातील एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यात दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
क्वारंटाईन केलेल्या या आठ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परंतु त्यांच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जाणार नसल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले. या आठ जणांपैकी सहा जण लंडन येथे वास्तव्याला होते तर दोन विद्यार्थिनी फिलीपाईन्समधील मनिला येथे शिक्षणानिमित्ताने गेल्या होत्या. या आठ जणांमध्ये काही जण दिग्रस, पुसद तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र शासनाने विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी वंदे भारत उपक्रमांतर्गत खास विमानसेवा सुरू केली होती. या विमानाद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील हे आठ जण बुधवार १३ मे रोजी येथे दाखल झाले. त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. १४ दिवसानंतर पुन्हा आरोग्य तपासणी करून त्यांना जिल्ह्यातील आपल्या गावी रवाना केले जाणार आहे.