यवतमाळमध्ये शेतकरी दाम्पत्याने संपवली जीवनयात्रा; चार लेकरांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:55 IST2025-12-22T12:40:42+5:302025-12-22T12:55:02+5:30
पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने रविवारी पत्नीनेही स्वतःला संपवले

यवतमाळमध्ये शेतकरी दाम्पत्याने संपवली जीवनयात्रा; चार लेकरांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं
Yavatmal Farmer Death: राज्यात कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील भवानी येथील अशोक दत्ता कुंटलवाड (५०) आणि त्यांच्या पत्नी सविता अशोक कुंटलवाड (४५) या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. शनिवारी पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, तर पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने रविवारी पत्नीनेही त्याच विहिरीत आपले जीवन संपवले.
नेमकी घटना काय?
अशोक कुंटलवाड यांच्याकडे जेमतेम तीन एकर शेती होती. गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी आणि वाढते कर्ज यामुळे ते प्रचंड विवंचनेत होते. शनिवारी अशोक हे नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले, मात्र ते बराच वेळ घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली असता, गावातील विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला.
पत्नीनेही संपवलं जीवन
घरातील कर्त्या पुरुषाने अशा प्रकारे जगाचा निरोप घेतल्यामुळे पत्नी सविता कुंटलवाड पूर्णपणे खचून गेल्या होत्या. पतीच्या निधनाचे दुःख आणि भविष्यातील मुलांच्या काळजीने त्यांना ग्रासले होते. रविवारी जेव्हा घरात पतीच्या अंत्यविधीची तयारी किंवा सुतक सुरू असतानाच, सविता यांनीही पतीच्या पावलावर पाऊल ठेवत विहिरीत उडी घेतली. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या अशा जाण्याने भवानी गावावर शोककळा पसरली आहे.
चौघांच्या डोक्यावरून छत्र हरपले
कुंटलवाड दाम्पत्याच्या मागे एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. आई-वडिलांच्या या टोकाच्या निर्णयामुळे ही मुले आता उघड्यावर आली असून, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. या घटनेची माहिती मिळताच दराटी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. कर्जबाजारीपणा हेच या आत्महत्येमागचे मुख्य कारण असल्याचे नातेवाइकांनी सांगितले आहे.