नक्षल चळवळीला पैसा पुरविल्याचा दम देत, डिजिटल अरेस्ट करून उकळले ९७ लाख
By सुरेंद्र राऊत | Updated: December 1, 2025 18:25 IST2025-12-01T18:24:29+5:302025-12-01T18:25:33+5:30
यवतमाळ शहरातील धक्कादायक प्रकार : बँक खात्यातील पैसे संपल्यावर शेतीवर कर्ज घेण्यासाठी टाकला दबाव

Digital arrests made for allegedly providing money to Naxal movement, 97 lakhs fraud
यवतमाळ : शहरातील सारस्वत चाैक परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्याला व्हाॅट्सअप काॅल करून तुम्ही कॅनरा बँकेतील चार अकाऊंटमधून नक्षल चळवळीला २५० काेटी रुपये पुरविल्याचा दम दिला. तुमच्यावर फाैजदारी कारवाई करून तुम्हाला अटक करण्यासाठी येत आहाेत, सांगत ६१ वर्षीय शेतकऱ्याला डिजिटल अरेस्ट केले. त्यांच्याकडून ८ ते २६ नाेव्हेंबर दरम्यान तब्बल ९६ लाख ६० हजार रुपये उकळले. पैसे संपल्यानंतर ठगबाजाने शेतीवर लाेन घेऊन पैसे पाठवा, असे सांगताच फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ३० नाेव्हेंबर राेजी अवधूतवाडी पाेलिस ठाण्यात धाव घेऊन फसगत झाल्याची तक्रार दिली.
गिरीष श्रीधर कळसपूरकर रा. सारस्वत चौक अवधूतवाडी यवतमाळ असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कळसपूरकर यांना ८ नाेव्हेंबर राेजी 9552707109, 9187099185 या दाेन क्रमांकावरून व्हाॅट्सअप काॅल आला. संदीप राॅय बाेलताे असे सांगून तुझ्या नावाने कॅनरा बँकमध्ये अकाऊंट उघडलेला असून पाच राज्यात तुमचे अकाऊंट ओपन झाले आहेत. तुम्ही २५० करोड रुपयांचे ट्रान्जेक्शन केले असून हे पैसे तुम्ही नक्षलवादी यांना दिले आहे. त्या नंतर त्या अज्ञात व्यक्तीने कळसपूरकर यांच्या नावाचे एटीएम कार्डचा फोटो पाठवून तुम्हाला अरेस्ट करावे लागेल. तुमच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेचा भंग झाला असून तुम्हाला रात्री १२ वाजेपावेतो अटक करीत आहेत, अशी धमकी दिली. त्यांनतर राॅयने पैशांची मागणी केली. तो म्हणत होता की मी कोलाबा पोलिस स्टेशनचा अधिकारी बोलत असून तुम्ही दररोज प्रत्येक बॅक खात्यातील आरटीजीएस करुन बँकेत असलेली सर्व रक्कम मला वळती करा.
८ नाेव्हेंबर राेजी त्याचे दर दोन तासांनी कळसपूरकर यांना कॉल चालू होते. भीतीपोटी रावसाहेब पटवर्धन पतपेढी आर्णी रोड यवतमाळ येथून ११ नाेव्हेंबर राेजी १४ हजार ३० रुपये आरटीजीएस केले. त्यानंतर १२ नाेव्हेंबरला आयडीबीआय बँक आठ लाख ५ हजार, १३ नाेव्हेंबरला पाच लाख ८० हजार, १४ नाेव्हेंबर राेजी ३७ लाख ४५ हजार, १९ नाेव्हेंबर राेजी अडीच लाख रुपये, २४ नाेव्हेंबर राेजी दाेन लाख ६० हजार, २६ नाेव्हेंबर राेजी २६ लाख रुपये असे एकूण ९६ लाख ६९ हजार ७३० रुपये आरटीजीएसने संदीप राॅय याला पाठवले. त्यानंतर राॅय याने शेतीवर लोन घेऊन पैसे पाठवत राहा, असा दम दिला. त्यांनतर संशय आल्याने गिरीश कळसपूरकर यांनी सायबर पाेलिसांकडे धाव घेतली. तेथून त्यांना अवधूतवाडी पाेलिस ठाण्यात पाठविण्यात आले. पाेलिसांनी संदीप राॅय नामक अज्ञात व्यक्ती विराेधात कलम ३१८(४) बीएनएस, कलम ६६(ड) आयटी ॲक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.