करंट लागून काका-पुतण्याचा मृत्यू; पुसद तालुक्यात हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 13:51 IST2021-09-29T13:51:39+5:302021-09-29T13:51:48+5:30
शेजारच्या शेतकऱ्याने जंगली प्राण्यांच्या उपद्रवापासून पीक वाचविण्यासाठी शेताला तारेचे कुंपण केले आहे.

करंट लागून काका-पुतण्याचा मृत्यू; पुसद तालुक्यात हळहळ
पुसद : तालुक्यातील इसापूर (धरण) येथे शेतातील तारेच्या कुंपणाचा करंट लागून काका-पुतण्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून, बुधवारी सकाळी उघडकीस आली.
गाैतम निवृत्ती आठवले (३२) आणि पप्पू देवानंद आठवले (१७) अशी मृत काका-पुतण्याची नावे आहे. हे दोघे मंगळवारी सायंकाळी म्हैस घेऊन शेतातून निघाले होते. बाजूच्या शेतातून रस्ता होता. त्या शेतातून जात असताना अचानक त्यांना तारांच्या कुंपणाचा करंट लागला. त्यात म्हशीसह दोघेही जागीच गतप्राण झाले.
शेजारच्या शेतकऱ्याने जंगली प्राण्यांच्या उपद्रवापासून पीक वाचविण्यासाठी शेताला तारेचे कुंपण केले आहे. त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. त्याचा करंट लागून म्हशीसह काका-पुतण्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर दोघांचेही मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी आणण्यात आले. पंचनामा करताना इसापूरचे प्रभारी सरपंच बी.सी. थोरात, पोलीस पाटील रामभाऊ थोरात आणि खंडाळाचे ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू उपस्थित होेते.