कापसाचे उत्पन्न घटणार
By Admin | Updated: October 12, 2014 23:38 IST2014-10-12T23:38:22+5:302014-10-12T23:38:22+5:30
वणी तालुका हा पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जातो़ मात्र यावर्षी हे पांढरे सोने पिकविणारे शेतकरी कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता बळावल्याने चिंताग्रस्त बनले आहेत़

कापसाचे उत्पन्न घटणार
लाल्या रोगाची लागण : कापसाला हवा सहा हजार रूपये भाव
वणी : वणी तालुका हा पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जातो़ मात्र यावर्षी हे पांढरे सोने पिकविणारे शेतकरी कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता बळावल्याने चिंताग्रस्त बनले आहेत़ त्यामुळे केंद्र शासनाने कापसाच्या हमी भावामध्ये भरीव वाढ करावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे़
वणी क्षेत्रातील ९० टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ मात्र यावर्षी पावसाळ्यात पाऊस अपुरा पडला़ त्यामुळे पिकांची वाढ खुंटली़ आता तर महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतांना भेगा पडल्या आहेत़ त्यामुळे कोरडवाहू पिके संकटात सापडली आहे़ वणी क्षेत्रात कापूस, सोयाबीन व तूर ही मुख्य पिके घेतली जातात़ त्यात सोयाबीन पीक काढणीच्या वाटेवर आहेत़ सोयाबिनचेही उत्पादन समाधानकारक नाहीत, असे शेतकरी सांगत आहे़
कापूस पीक तर शेतकऱ्यांच्या आर्थिक घडीचा मोठा आधार असते़ मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने कपाशीची झाडे वाढलीच नाहीत़ झाडांना अपेक्षेप्रमाणे फळ धारणाही झाली नाही़ एवढेच नव्हे तर आता झाडांवर लाल्या रोगांचे आक्रमण होऊ लागले आहे़ त्यामुळे कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यास साथ देईल की नाही, याविषयी शेतकरी साशंक आहेत़ दिवाळी जवळ आली, तरी अजून कापसाचे बोंड शेतकऱ्यांच्या घरी आले नाही़ त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे़
सहकारी संस्थांचे व बँकाचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी यावर्षी शेती केली आहे़ जर उत्पादन अपेक्षेप्रमाणे झाले नाही, तर कर्ज कसे फेडावे, पुढील वर्षाचा संसाराचा गाडा कसा ओढावा, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे़ पाऊस नसल्याने तुरीच्या उत्पादनाचीही आशा राहिली नाही़
रबी पिकांची तर आशाच मावळली आहे़ ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, असे १० टक्के शेतकरी रबी पिकांची पेरणी करू शकतील़ ९० टक्के शेतकऱ्यांच्या शेतीतून सोयाबीन पीक निघाल्यानंतर जमिनी पडूनच राहण्याची चिन्हे आहेत़ शासनाने कापूस पिकांचे उत्पादन कमी झाल्यामुळे कापसाला किमान सहा हजार रूपये हमी भाव द्यावा, अशी अपेक्षा आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)