कोरोना लढ्याने पोलिसांना पहिल्यांदाच सहानुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:00 AM2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:00:33+5:30

कोरोना संसर्गाच्या भीतीने सर्वत्र लॉकडाऊन आहे. देशभरातील १३६ कोटी जनता घरात आहे. केवळ अत्यावश्यक सेवा तेवढ्या सुरू आहेत. हे सेवेकरी आपला जीव धोक्यात घालून जनतेसाठी काम करीत आहे. त्यात पोलिसांचाही संघर्ष सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. लोक घरात असताना पोलीस मात्र रस्त्यावर कोरोनाच्या वातावरणातही भरउन्हात ड्युटी करताना दिसत आहे.

Corona fights sympathy for police for the first time | कोरोना लढ्याने पोलिसांना पहिल्यांदाच सहानुभूती

कोरोना लढ्याने पोलिसांना पहिल्यांदाच सहानुभूती

Next
ठळक मुद्देसंचारबंदीतील परिश्रम : प्रतिमा सुधारतेय, जनतेतून मदतीचा हात

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलीस म्हटले की समाजातील सर्वच घटक त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहतात. लाचखोर, हप्तेखाऊ, उर्मट, दंडुकेशाही अशीच पोलिसांची प्रतिमा जनतेच्या मनात तयार झाली आहे. चित्रपटातही असेच चित्र दाखवून जणू त्यावर शिक्कामोर्तब केले जाते. त्यामुळे पोलिसांच्या नशिबी जनतेची सहानुभूती मिळण्याचा योग दुर्मिळच. परंतु सध्या कोरोनाच्या या लढाईत सर्व जनता घरात असताना पोलीस मात्र रस्त्यावर योद्धा म्हणून काम करतो आहे. त्यामुळेच पोलिसांप्रती जनतेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सहानुभूती वाढत असून त्याचा परिणाम पोलिसांची प्रतिमा सुधारण्यावर होतो आहे.
कोरोना संसर्गाच्या भीतीने सर्वत्र लॉकडाऊन आहे. देशभरातील १३६ कोटी जनता घरात आहे. केवळ अत्यावश्यक सेवा तेवढ्या सुरू आहेत. हे सेवेकरी आपला जीव धोक्यात घालून जनतेसाठी काम करीत आहे. त्यात पोलिसांचाही संघर्ष सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. लोक घरात असताना पोलीस मात्र रस्त्यावर कोरोनाच्या वातावरणातही भरउन्हात ड्युटी करताना दिसत आहे. प्रत्येक जण कोरोनाचा धसका घेऊन घरात असताना पोलीस रस्त्यावर योद्धासारखा कोरोनाशी लढतो आहे. वारंवार सूचना देऊनही पुन्हा-पुन्हा रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना घरात लोटण्यासाठी व या माध्यमातून समाजातील कोरोनाचा संभाव्य संसर्ग थांबविण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांना नाईलाजाने काही मुजोरांवर दंडुकेही चालवावे लागत आहे. पोलिसांनाही कोरोनाची भीती आहे. त्यामुळे ते स्वत: सुरक्षित राहून कुटुंबालाही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेक पोलीस घराबाहेरच दुपारचे जेवण आटोपतात. कोरोनाची भीती झुगारुन पोलीस तासन्तास ड्युटी करतात. त्यांचे हे परिश्रम पाहून कधी नव्हे ते पहिल्यांदाच पोलिसांबद्दल समाजातील सर्व घटकात कमालीची सहानुभूती निर्माण झाली आहे. पोलीस आपल्यासाठी लढतोय याची खात्री जनतेला पटली आहे. त्यामुळेच जनतेकडून पोलिसांना चहा, नास्ता, जेवण या सोई-सुविधा पुरविण्यासाठी मदतीचा हात पुढे आला आहे. जनता सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पोलिसांना उत्स्फूर्त मदत करताना दिसते. यामुळे जनतेच्या मनात पोलिसांप्रती सद्भाव निर्माण होतोय.

प्रशासनही घेते व्यवस्थेची काळजी
संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर भरउन्हात उभे राहणाºया, नागरिकांनी घरात रहावे म्हणून हात जोडणाºया या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रशासनही आवश्यक ती सर्व काळजी घेताना दिसते. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे स्वत: ड्युटीवरील पोलिसांच्या चहा, नास्ता, जेवणाबाबत दक्ष असतात. सील केलेल्या भागात तैनात पोलिसांसाठी एसपींनी स्वत: मुख्यालयातील पोलीस मेस उघडून दिली. तेथेच होमगार्ड व पोलिसांसाठी भोजन बनविले जात आहे. नागरिकांमध्ये घरात राहण्याबाबत जनजागृती करा, त्यांना हात जोडा, शक्यतोवर बळाचा वापर करू नका, आधीच लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना आणखी मन:स्ताप देऊ नका अशा स्पष्ट सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बंदोबस्तावरील सर्व पोलिसांना दिल्या आहे. त्याचे बहुतांश पालनही केले जात आहे.

सहानुभूती दीर्घकाळ टिकविण्याचे आव्हान
पोलिसांची आतापर्यंत जनतेच्या मनात असलेली प्रतिमा कोरोनातील परिश्रमामुळे काही प्रमाणात का होईना बदलण्यास, पुसण्यास मदत होणार आहे, एवढे निश्चित. पोलिसांप्रती समाजात निर्माण झालेली सहानुभूती, सुधारत असलेली प्रतिमा तमाम पोलिसांना लॉकडाऊन संपल्यानंतरही जनतेच्या मनात टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.

Web Title: Corona fights sympathy for police for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.