दारव्हा येथे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
By Admin | Updated: October 30, 2016 00:14 IST2016-10-30T00:14:18+5:302016-10-30T00:14:18+5:30
नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज भरण्यात आले.

दारव्हा येथे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी ११ तर सदस्यांसाठी १३९ नामांकन
दारव्हा : नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज भरण्यात आले. नगराध्यक्षपदाच्या एकूण उमेदवारांची संख्या ११ तर सदस्यपदाच्या उमेदवारांची संख्या १३९ पर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, शनिवारी अनेक नाट्यमय घडामोडीनंतर या निवडणुकीकरिता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली. तर शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहे. त्याचप्रमाणे इतर पक्ष व अपक्षांची संख्या अधिक असल्याने बहुरंगी लढतीची चिन्हं आहे.
काँग्रसचे सिद्धार्थ गडपायले व शिवसेनेचे बबनराव इरवे यांनी नगराध्यक्षपदासाठी यापूर्वीच उमेदवारी अर्ज भरले. पक्षाने यावर शनिवारी शिक्कामोर्तब केले. भाजपाच्यावतीने सचिन जाधव यांनी नामांकन अर्ज दाखल केला. सदस्यपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी या प्रमुख पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्याचबरोबर काही अपक्ष असे एकूण १३९ नामांकन सादर झाले.
नामांकन दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समेट घडून आला. कॉग्रेसकडे नगराध्यक्षपद व १५ सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे सदस्यपदाच्या पाच जागा आल्या. काँग्रेसचे राहुल ठाकरे, सैयद फारूक, अशोक चिरडे तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वसंत घुईखेडकर, उत्तमराव शेळके, अमोल राठोड यांच्यात चर्चा होवून आघाडीचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेने नगराध्यक्षांसह १६ अधिकृत व दोन पुरस्कृत उमेदवार मैदानात उतरविले. याबाबतची माहिती पक्ष निरीक्षक बाबू पाटील जैन यांनी दिली. भाजपानेही नगराध्यक्ष आणि सदस्य पदाच्या १५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष दत्तात्रय राहाणे यांनी सांगितले. दाखल झालेल्या अर्जातील मोठ्या प्रमाणात नामांकन कायम राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होईल, अशी चर्चा रंगत आहे.
(तालुका प्रतिनिधी)