काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी रखडली

By Admin | Updated: September 6, 2014 02:23 IST2014-09-06T02:23:03+5:302014-09-06T02:23:03+5:30

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील आमदारांविरुद्ध उघड बंड पुकारणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमुळे काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी रखडली आहे.

Congress District Working Committee | काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी रखडली

काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी रखडली

यवतमाळ : काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील आमदारांविरुद्ध उघड बंड पुकारणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमुळे काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी रखडली आहे. दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या नावांच्या समावेशाला तीन आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला असताना प्रदेशाध्यक्ष मात्र या असंतुष्टांना यादीत स्थान देण्यासाठी आग्रही आहेत.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. त्याची आचारसंहिता आठवडाभरात जाहीर होणार आहे. परंतु या निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या काँग्रेसची यवतमाळ जिल्ह्यात कार्यकारिणीच नाही. केवळ जिल्हाध्यक्ष कार्यरत आहेत. त्यांनी अद्यापही आपली टीम जाहीर केलेली नाही. ही टीम जाहीर होण्याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. परंतु या टीममध्ये नेमका कुणाचा समावेश करावा यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे सांगितले जाते.
काँग्रेसमधील नेत्यांची दुसरी फळी या यादीत अडसर ठरली आहे. या फळीने काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेसचे मंत्री, आमदार व नेत्यांविरुद्ध उघड भूमिका घेतली होती. या नेत्यांना व त्यांच्या मुलांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी देऊ नये अशी पत्रपरिषदेत जाहीर मागणी करताना कासावार यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही मागितला होता. त्यानंतर कासावारांच्या राजीनाम्याचे नाट्य घडले. नंतर पुन्हा त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्यात आले. पक्षाच्या आमदारांविरुद्ध उघड भूमिका घेणाऱ्या या दुसऱ्या फळीतील नेत्यांविरुद्ध विद्यमान आमदारांमध्ये प्रचंड रोष पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या सर्व असंतुष्टांना खुद्द काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आश्रय दिला आहे. त्यातही मोघे विरोधकांना तर दिग्रसमधून विधानसभेचे तिकीट देण्याची तयारी चालविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress District Working Committee