बंद घरे आणि मंदिरेही चोरट्यांच्या निशाण्यावर

By Admin | Updated: May 23, 2015 00:10 IST2015-05-23T00:10:14+5:302015-05-23T00:10:14+5:30

वाघापूर-लोहारा या वळण रस्त्यावरील नवीन वसाहतींमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

Close houses and temples are also seen in the thieves | बंद घरे आणि मंदिरेही चोरट्यांच्या निशाण्यावर

बंद घरे आणि मंदिरेही चोरट्यांच्या निशाण्यावर

घरफोड्या वाढल्या : पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी
यवतमाळ : वाघापूर-लोहारा या वळण रस्त्यावरील नवीन वसाहतींमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घर फोडण्यासह मंदिरही चोरट्यांनी टार्गेट केले आहे. कुठलीही घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे पाहता तक्रारी देण्याचेही टाळले जात आहे.
रात्री २ ते ५ वाजताच्या सुमारास या चोऱ्या होत आहेत. मैथिलीनगर, साठवणे ले-आऊट, अहल्यानगरी यासह विविध भागांमध्ये घरफोड्या झाल्या. काही दिवसांपूर्वी भरदिवसा तीन घरे फोडण्यात आली होती. आता घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरी केली जात आहे. मुख्य दाराचे कुलूप तोडून आत शिरलेले चोरटे महागड्या वस्तू किंवा रोखेचा शोध घेतात. यासाठी कपाट, दिवाण आदी प्रकारच्या वस्तूची तोडफोड करून ठेवतात.
अंधाराचा फायदा घेत चोरी केली जात आहे. साधारणत: चार वाजतापर्यंत हाती लागेल तेवढ्या महागड्या वस्तू घेवून चोरटे पसार होतात. आता तर या चोरट्यांनी मंदिरांनाही आपले लक्ष्य केले आहे. मूर्ती आणि दानपेटीही लंपास करण्याचे प्रकार वाढले आहे. मैथिलीनगरातील गणपती मंदिरात मागील काही दिवसात दोनवेळा हा प्रकार घडला. वाघापूर-लोहारा या वळण मार्गावरून रात्रभर वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र पोलिसांचे वाहन अपवादानेही या भागातून गस्त घालताना दिसत नाही. परिसरातील बंद दिव्यांमुळे सर्वत्र काळोख असतो. या संधीचाही फायदा चोरटे घेत आहे. ग्रामपंचायतीकडून खांबावरील पथदिवे लावण्यास टाळाटाळ केली जाते. तोंडी तक्रार केल्यानंतर पाच-सहा महिन्यानंतर लावलेला दिवाही बंद पडतो. चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

कळंबमध्ये रात्रीतून तीन घरफोड्या
कळंब : शहरात गुरुवारी रात्री तीन धाडसी घरफोड्या झाल्या. वारंवार होणाऱ्या घरफोड्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील महावीरनगरातील रहिवासी संदीप मोहुर्ले यांच्या घराच्या मागील दाराची कडी तोडून सुटकेसमध्ये असलेले २० हजार रुपये लंपास केले. याच भागातील ठाकरे आणि धनराज पाटील यांची घरेही अज्ञात चोरट्यांनी फोडली. घरातील साहित्य लंपास केले. सुदैवाने मौल्यवान साहित्य चोरट्यांच्या हाती लागले नाही. त्यांच्या घरातील बँग जवळच्या नाल्यात अस्ताव्यस्त आढळून आल्या. या आधी काही दिवसांपूर्वी गांधी चौकातील रहिवासी प्रशांत मधुकर फाळके, प्रशांत विलास खसाळे, गजानन मुके आणि डॉ.कोल्हे यांच्या घरावरही चोरट्यांनी डल्ला मारला. तेथून मौल्यवान साहित्य आणि रोख लंपास केली. विशेष म्हणजे मागील एक महिन्यांपूर्वी शर्मा-ले आऊट मधील विनायक मस्कर यांचे घर भरदिवसा फोडले होते. त्याचा तपास अजूनही पोलिसांना लावता आलेला नाही. वारंवार होणाऱ्या चोऱ्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांना तत्काळ जेरबंद करा, अशी मागणी नागरिकातून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Close houses and temples are also seen in the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.