Citizens, be careful while downloading the mobile app | नागरिकांनो, मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करताना राहा सावध

नागरिकांनो, मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करताना राहा सावध

ठळक मुद्देमोबाईल दुसऱ्याच्या नियंत्रणात : बँक खात्यासह इतरही गोपनीय माहितीवर चोरट्यांचा डोळा

यवतमाळ : मोबाईलच्या प्लेस्टोअरमध्ये एका पेक्षा एक भारी
अ‍ॅप्स आहेत. आता मोबाईलची रॅम (स्टोअरेज क्षमता) वाढल्याने
प्रत्येक गोष्टीचे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा आनंद मोबाईल
युजर्स घेत आहेत. मात्र बेभान होऊल अ‍ॅप्स डाऊनलोड करणे
धोक्याचे आहे. एखाद्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून फ्रॉडेस्टर (ठगणारे)
तुमच्या मोबाईलचा ताबा घेऊन तुमच्या नकळत सर्व गोपनीय माहिती
एका झटक्यात मिळवू शकतात. मोबाईल क्रमांकाला लिंक असलेले
बँक खाते परस्पर हाताळू शकतात. स्टेट बँकेच्या एका ग्राहकाला
याच पद्धतीने पावणे तीन लाखांनी गंडा घातला.

बँकेचे सर्व व्यवहार मोबाईलवरून नियंत्रित करता येतात. चालू खात्यासोबत बचत ठेव (एफडी), विमा पॉलिसी हे सर्व व्यवहार बँकेत न जाता करता येते. यामुळे तरूण पिढी बँकेत प्रत्यक्ष जाऊन रांगेत लागण्याऐवजी मोबाईलवरूनच सर्व व्यवहार करतात. पैस्याची देवाणघेवाणही मोबाईल अ‍ॅप्सद्वारे केली जाते. सोबतच छोट्या मोठ्या व्यवहारासाठी वापरात येणारे ई-व्हॅलेट (पेटीएम, गुगल-पे, फोन-पे, भीम अ‍ॅप) मोबाईल मध्येच डिटेल्ससह स्टोअर केलेले असते. त्यामुळे मोबाईलमध्ये अ‍ॅप्स डाऊनलोड करताना सतर्क असणे आवश्यक आहे. चुकीचा अ‍ॅपडाऊनलोड करणे म्हणजे चोराला तिजोरी उघडी ठेवून चोरी करण्याचे निमंत्रण देण्यासारखे आहे.
लोहारा पोलीस ठाणे हद्दीत स्टेट बँकेत ग्राहकाच्या एफडीचे पैसे परस्पर काढून पावणे तीन लाखांनी गंडा घातला. या ग्राहकाने ‘एनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड केले. हे अ‍ॅप मोबाईलमध्ये येताच फ्रॉडेस्टरने त्या ग्राहकाच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस(वापर) घेतला.
यामुळे फ्रॉडेस्टरचे संपूर्ण नियंत्रण ग्राहकाच्या मोबाईलवर आले. त्याने बँक खात्याची सर्व डिटेल्स मिळविली. कस्टमर आयडी मिळाला हा आयडी मिळताच फ्रॉडेस्टरने ग्राहकाची बँकेत असलेली मुदतठेव तोडली, ती रक्कम त्याच्या बचत खात्यात वळती केली. नंतर ओटीपी जनरेट करून पैसे परस्पर काढून घेतले. यावरून चुकीचा अ‍ॅपडाऊन लोड करणे किती महागात पडू शकते याची प्रचिती येते. मोबाईल प्लेस्टोअरमध्ये टेक्नीकल सपोर्टसाठी लागणारे अनेक अ‍ॅप आहेत. यापैकी एखादा अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर फ्रॉडेस्टरचे काम सोपे होते. तो न कळत तुमच्या मोबाईलचा ताबा घेऊन त्यात असलेली संपूर्ण माहिती वापरु शकतो. इतकेच काय ई-वॉलेटमधील रकमेवरही त्याला डल्ला मारणे सहज सोपे होते. आता अशा पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात बँक व पोलीसही एका मर्यादेपलिकडे जाऊन मदत करू शकत नाही.

या अ‍ॅप्सपासून राहावे दूर
प्ले स्टोअरध्ये असलेल्या एनी डेस्क, टीमीव्हिव्हर, फिक्स स्पोर्ट, एअर ड्राईड ही टेक्नीकल सपोर्ट देणारी अ‍ॅप सध्या प्रचलित आहे. याचाच वापर करून फ्रॉडेस्टर ग्राहकांच्या पैशावर हात साफ करीत आहे.

परिपूर्ण माहिती असल्याशिवाय मोबाईलद्वारे बँकींग, ईव्हायलेटचा वापर करणे टाळावे. तरच आपला पैसा व गोपनीय माहिती सुरक्षित राहू शकते.
- अमोल पुरी
सहायक पोलीस निरीक्षक
सायबर सेल, यवतमाळ.

Web Title: Citizens, be careful while downloading the mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.