पदाधिकाऱ्यांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:09+5:30

जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. मात्र गेल्यावेळी अखेरचे काही महिने शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. त्यामुळे विरोधकच उरले नव्हते. आता भाजपचे १८ सदस्य विरोधात राहणार आहेत. त्यापैकी काही सदस्य अभ्यासू व अनुभवी आहेत. त्यांच्या प्रश्नांचा मारा नवीन पदाधिकाऱ्यांना परतवून लावावा लागणार आहे.

The challenge before the office bearers | पदाधिकाऱ्यांपुढे आव्हान

पदाधिकाऱ्यांपुढे आव्हान

ठळक मुद्देजिल्हा परिषद : आचारसंहिता संपण्याची सदस्यांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांपुढे अनेक समस्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. प्रशासनासोबतच जिल्ह्याच्या विकास योजनांकडे त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली. अध्यक्ष वगळता उर्वरित सर्वच पदाधिकारी नवखे आहेत. अध्यक्षांनाही केवळ तीन ते चार महिन्यांचाच शिक्षण सभापती पदाचा अनुभव आहे. उर्वरित पाचही जण पहिल्यांदाच पदाधिकारी झाले आहे. या सर्वच पदाधिकाºयांपुढे काही अभ्यासू सदस्यांचे आव्हान उभे ठाकणार आहे. सोबतच जुने पदाधिकारीही सर्वसाधारण सभेसह इतर सर्वच विषय समित्यांच्या सभेत नवीन पदाधिकाऱ्यांना भंडावून सोडण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. मात्र गेल्यावेळी अखेरचे काही महिने शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. त्यामुळे विरोधकच उरले नव्हते. आता भाजपचे १८ सदस्य विरोधात राहणार आहेत. त्यापैकी काही सदस्य अभ्यासू व अनुभवी आहेत. त्यांच्या प्रश्नांचा मारा नवीन पदाधिकाऱ्यांना परतवून लावावा लागणार आहे. याशिवाय भाजपचे माजी पदाधिकारीही मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे.
तथापि, अध्यक्षांना काही महिन्यांचा सभापती पदाचा अनुभव असल्याने त्या सभागृह चांगल्यारितीने हाताळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांना काही नवीन अभ्यासू पदाधिकाऱ्यांचीही साथ लाभणार आहे. महाविकास आघाडीकडे तब्बल ४३ सदस्य असल्यामुळे सर्वसाधारण सभेसह विषय समित्यांच्या सभेत नवीन पदाधिकारी विश्वासाने सामोरे जाण्याची शक्यता आहे. मात्र या पदाधिकाऱ्यांना प्रशासनावर वचक निर्माण करावा लागणार आहे. प्रशासनाची बिघडलेली शिस्त दुरुस्त करावी लागणार आहे. जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू करावी लागणार आहे. योजनांच्या योग्य अंमलबजावणीकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागणार आहे.

स्थायी समितीच्या चार जागांसाठी चुरस
स्थायी समितीमधील श्रीधर मोहोड, राम देवसरकर आणि जया पोटे हे तीन सदस्य आता सभापती झाले आहे. बाळासाहेब कामारकर उपाध्यक्ष झाले आहे. त्यामुळे चार जागा रिक्त होणार आहे. या चार जागांसाठी सर्वच पक्षीय सदस्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. चारपैकी दोन जागा काँग्रेस आणि प्रत्येकी एक जागा शिवसेना व राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. मात्र भाजपकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. माजी पदाधिकारी स्थायी समितीत येण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहे.

Web Title: The challenge before the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.