दुचाकी अडवून मारहाण, अडीच लाख घेवून चोरट्यांचा पोबारा

By अविनाश साबापुरे | Updated: March 28, 2023 17:02 IST2023-03-28T17:01:33+5:302023-03-28T17:02:09+5:30

दिग्रसमध्ये भरदिवसा लुटमार : तीन चोरटे पसार

Broad day robbery in Digras, 3 thieves snatches 2.5 lakhs | दुचाकी अडवून मारहाण, अडीच लाख घेवून चोरट्यांचा पोबारा

दुचाकी अडवून मारहाण, अडीच लाख घेवून चोरट्यांचा पोबारा

दिग्रस (जि.यवतमाळ) : भरदिवसा दुचाकी अडवून अज्ञात चोरट्यांनी मारहाण केली. त्यानंतर अडीच लाख रुपये असलेली पिशवी घेऊन दुचाकीवर पोबारा केला. ही घटना मंगळवारी भरदिवसा दिग्रस-आर्णी बायपासवर हिंदू स्मशानभूमीसमोर घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लाख रायाजी येथील नवाब खान दायम खान पठाण (७०) व आयाजोद्दीन काझी हे दोघे तीन एकर शेती खरेदी करण्यासाठी दिग्रसकडे येत होते. त्यांच्याकडे अडीच लाख रुपये रोख असलेली पिशवी हाेती. दरम्यान, त्यांच्या मागाहून एका दुचाकीवर तीन चोरटे आले. त्यापैकी दोघांच्या तोंडाला पांढरा शेला बांधलेला होता. या चोरट्यांनी सावंगा बुद्रूक येथील विद्युत केंद्राजवळ नवाब खान व आयाजोद्दीन काझी यांच्या दुचाकीला कट मारला. तोच बहाणा करून त्यांच्याशी वाद घातला.

या वादात नवाब खान यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला जावून पडली होती. वादाकडे दुर्लक्ष करून ते पुन्हा दिग्रसकडे निघाले. मात्र चोरट्यांनी पुन्हा दिग्रस येथील हिंदू स्मशानभूमीसमोर त्यांची दुचाकी अडविली. गाडीची चावी काढून आयाजोद्दीन काझी यांना शिवीगाळ करीत चोरट्यांनी मारहाण सुरू केली. नवाब खान यांच्याकडील अडीच लाख रुपये असलेली पिशवी जबरीने हिसकावून चोरटे पळून गेले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तीनही आरोपी आर्णी मार्गाने पळाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी नाकाबंदी करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी नवाब खान दायम खान पठाण रा. लाख रायाजी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Broad day robbery in Digras, 3 thieves snatches 2.5 lakhs