भाजपने पाच वर्षे टॉयलेट पेपरसारखा वापर केला, किशोर तिवारी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:26 IST2019-09-14T18:24:04+5:302019-09-14T18:26:01+5:30
भाजप सरकारने दिलेल्या शब्दांचे पालन केले नाही. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून अधिकार दिले.

भाजपने पाच वर्षे टॉयलेट पेपरसारखा वापर केला, किशोर तिवारी यांचा आरोप
यवतमाळ - भाजप सरकारने दिलेल्या शब्दांचे पालन केले नाही. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून अधिकार दिले. मात्र नंतर त्यावर मर्यादा घातल्या. त्यामुळे अपेक्षित काम करता आले नाही. पाच वर्षे माझा केवळ टॉयलेट पेपरसारखा वापर केला गेला, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष तथा शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केला.
किशोर तिवारी म्हणाले, भाजप सोबत २०१९ पर्यंतचा करार संपला आहे. शेतकरी, आदिवासी व मध्यमवर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारसोबत बसलो. मात्र त्यांनी दगा दिला. २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता, मात्र तो पाळला नाही. १६ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पांढरकवडा येथे जाहीर सभा झाली. या सभेचे संपूर्ण नियोजन माझ्याकडे होते. सभेला उपस्थितीही भरपूर होती. त्यानंतरही या सभेत माझा अपमान करण्यात आला. तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी थेट अपमान केला. पंतप्रधान मोदींनीसुद्धा भाषणात माझा नामोल्लेखही केला नाही.
वैयक्तिक लाभासाठी पद मागितले नाही
१९७७ पासून जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चळवळीत जुळलो आहे. त्यानंतरही भाजप सरकारकडून सन्मानाची वागणूक देण्यात आली नाही. सरकारकडे अधिका-यांच्या बदल्या, ठेकेदारी, कोळसा ट्रान्सपोर्टिंग या सारख्या वैयक्तिक लाभासाठी पद मागितले नसल्याचे तिवारी यांनी सांगितले.
भाजपला धडा शिकविणार
आता जिल्ह्यातील चार मतदारसंघातून विदर्भ जनआंदोलन समिती विधानसभा निवडणूक लढणार असून, आपला केवळ वापर करणाºयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही तिवारी यांनी सांगितले.