भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचा गोंधळ

By Admin | Updated: November 13, 2016 00:14 IST2016-11-13T00:14:47+5:302016-11-13T00:14:47+5:30

यवतमाळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिका सतत बदलत असल्याने या पक्षाचे पदाधिकारी,

BJP, Shiv Sena, NCP's mess | भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचा गोंधळ

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचा गोंधळ

नगरपरिषद निवडणूक : कुठे पाठिंबा, कुठे विरोध, कार्यकर्त्यांची मात्र कोंडी
यवतमाळ : यवतमाळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिका सतत बदलत असल्याने या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खुद्द उमेदवारसुद्धा संभ्रमात सापडले आहे. कुठे विरोध करावा लागत आहे, तर कुठे मांडीला मांडी लावून बसावे लागत असल्याने या कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपाच्या अभद्र युतीचा उदय झाला होता. त्याची पुनरावृत्ती आता विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळाली आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवाराला राष्ट्रवादी समर्थित अपक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. या उलट स्थिती नगरपरिषद निवडणुकांमध्ये आहे. वरच्या स्तरावर नेत्यांनी भाजप-सेना युती जाहीर केली असली तरी स्थानिक पातळीवर तसे चित्र नाही. अनेक ठिकाणी सेनेचे कार्यकर्ते कमळाच्या दिशेने धनुष्यबाण रोखलेले दिसत आहे. यवतमाळात नगराध्यक्षपदासाठी भाजपा व शिवसेना एकमेकांच्या विरोधात टक्कर देत आहे. येथे एक तर राष्ट्रवादीला नगराध्यक्षपदाचा सक्षम उमेदवारच मिळत नव्हता. प्रचंड प्रयत्न केल्यानंतर अखेरच्या क्षणी तो कसाबसा मिळाला. मात्र त्यालाही माघार घ्यावी लागली. विधान परिषद व नगराध्यक्ष या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने माघार घेतल्याने येथे पक्ष बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम अन्य ठिकाणी होताना दिसतो आहे. प्रभागांमध्येसुद्धा भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांना पाडायला निघाले आहे. कारण, युती भंगली आहे.
नेत्यांची आपल्या सोयीने होणारी ही मिलीभगत आणि त्यातील उलाढाल हा तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे. या गोंधळामुळे जनतेला कुठे कसे तोंड द्यावे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडतो आहे. पूर्ण विरोध किंवा पूर्ण युती नसल्याने या कार्यकर्त्यांना टोकाची भूमिकाही घेता येत नसल्याचे चित्र आहे. एकूणच संभ्रम आणि गोंधळात नगरपरिषदेच्या या निवडणुकांना भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सामोरे जात आहे. नेत्यांना मात्र कार्यकर्त्यांच्या या अवस्थेची कोणतीच फिकीर नसल्याचे दिसते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: BJP, Shiv Sena, NCP's mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.