मैत्रिणीनेच केला घात, अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 11:10 IST2021-12-15T10:59:32+5:302021-12-15T11:10:50+5:30
एका अल्पवयीन मुलीला तिच्याच अल्पवयीन मैत्रिणीने शौचास जाण्याचा बहाणा करुन एका नराधमाच्या हवाली केले. त्यानंतर त्या नराधमाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मैत्रिणीनेच केला घात, अल्पवयीन मुलीवर अत्याचार
यवतमाळ : मैत्रीण ही जिवलग सखी असते. सुख-दु:खाचे सारे गुज एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीकडे व्यक्त करते. परंतु दोन मैत्रिणींतील अशा विश्वासाला तडा देणारी घटना मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झरी तालुक्यातील एका पोडावर घडली.
जिच्यावर विश्वास ठेवला, त्याच मैत्रिणीने अल्पवयीन मुलीला एका नराधमाच्या हवाली केले. त्यानंतर त्या नराधमाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून अत्याचारी युवकाला मुकुटबन पोलिसांनी अटक केली आहे, तर नराधमाच्या हवाली करणारी मुलगीदेखील अल्पवयीन असल्याने तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका पोडावर शुक्रवारी १० डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. रात्री ८ वाजताच्या सुमारास पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीने शौचास जाण्याचा बहाणा करून गावातीलच सुनील टेकाम याच्या घरी नेऊन तिला सोडून दिले. यावेळी आरोपीने घरामागील बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
दुसरीकडे, बऱ्याच वेळापासून मुलगी घरी न आल्याने तिच्या आई-वडील व नातेवाईकांनी शोधाशोध केली असता, ती आरोपीच्या बाथरूममधून बाहेर पडताना दिसली. याबाबत पीडितेने घडलेली सर्व घटना आईला सांगितली. आईने लगेच मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी सुनील टेकामविरुद्ध भांदवी ३७६, ५०६, ४ व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला, तर पीडिताच्या मैत्रिणीविरुद्ध आरोपीस मदत केल्याप्रकरणी भादंवि कलम ३६३, ४, १७ नुसार गुन्ह्याची नोंद केली. घटनेचा पुढील तपास मुकुटबनचे पोलीस निरीक्षक अजित जाधव करीत आहेत.
याप्रकरणात पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून अत्याचारी युवकाला मदत करणारी मुलगीदेखील अल्पवयीन असल्याने तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे.
अजित जाधव, ठाणेदार, मुकुटबन