लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गत चार दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. झालेल्या अतिवृष्टीने नदीकाठच्या शेत शिवारातील १९ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर या अतिवृष्टीत २७ जनावरांचा मृत्यू झाला. ५५ घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी दिवसभर झालेल्या पावसाने उमरखेड तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला, तर झरी आणि तणी तालुक्यातील काही गावामधील वाहतूक ठप्प झाली होती.
जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गत चार दिवसांपासून धुंवाधार पाऊस सुरु आहे. या पावसाने मंगळवारी उमरखेड, द्वारी आणि वणी तालुक्यात चांगलाच कहर केला. अति पावसाने उमरखेड तालुक्यातील पळशी आणि चिंचोली संगम या गावांचा संपर्क तुटला होता, तर पुलावरून पाणी वाहत असल्याने हारी तालुक्यातील मांडवी ते बोरी हा रस्ता बंद होता. वणी तालुक्यातील बोरी ते मूर्ती आणि शिवणी ते चिंचोली हा मार्ग बंद राहिला. यामुळे या भागातील वाहतूक खोळंबली होती.
१० महसूल मंडळात झाली अतिवृष्टी नोंदसकाळी १० पर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाने १० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद केली. पूरपरिस्थितीत २७ जनावरांचा मृत्यू झाला, तर अति पावसाने ५५ घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू आहे.
३५ मिमी पावसाची झाली नोंदयवतमाळ ३३ मिमी, बाभुळगाव २८, कळंब ३१, दारव्हा २८, दिग्रस ५०, आर्णी ३१, नेर ३०, पुसद २८, उमरखेड ४१, महागाव ४६, वणी ३९, महागाव ३०, झरी जामणी ५०, केळापूर ४३, घाटंजी ३०, तर राळेगावमध्ये २४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३५ मिमी पाऊस झाला.
आधीच पूर त्यात प्रकल्पाचे पाणीईसापूर धरणाचे १३ गेट उघडण्यात आले आहे. या ठिकाणावरून ७४ हजार २८४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी पैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आले. यामुळे या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महागाव तालुक्यातील अथरपूस प्रकल्पाचे १० गेट ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. अडाण प्रकल्पाचे पाच गेट उघडण्यात आले आहेत. बेंबळा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. या ठिकाणावरून २५ सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सुरू आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३ दरवाजे उघडले. या ठिकाणावरून वर्धा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
२००२ च्या पूरपरिस्थितीची पुनरावृत्ती
- उमरखेड तालुक्यात २००२ मध्ये मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तब्बल २३ वर्षानंतर तालुक्यात सततच्या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने अश्रूचा पूर वाहत आहे.
- उमरखेड तालुक्यातील पळशी गावाला पुराचा वेढा बसला आहे. या ठिकाणच्या ४० कुटुंबाला शाळेमध्ये हलविण्यात आले आहे. याशिवाय एनडीआरएफची टीम या ठिकाणी तैनात ठेवण्यात आली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना होणार आहे.
बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविलेपूरपरिस्थितीत अडकलेल्या २२० बाधित नागरिकांनी नातेवाइकांकडे आश्रय घेतला. इतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. गृहोपयोगी साहित्याची नासधूस झाली.