कुठेतरी मिळेलच.. मतिमंद मुलाच्या शोधार्थ व्याकुळ मातेची पायदळ गावोगावी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:43 PM2023-02-07T12:43:11+5:302023-02-07T12:53:56+5:30

अंगावरचे दागिने विकून पोटच्या गोळ्याचा शोध सुरू; धुणीभांडी करून मुलाचा घेते ती शोध

A mother's wanderings on barefoot in search of her mentally retarded son | कुठेतरी मिळेलच.. मतिमंद मुलाच्या शोधार्थ व्याकुळ मातेची पायदळ गावोगावी भटकंती

कुठेतरी मिळेलच.. मतिमंद मुलाच्या शोधार्थ व्याकुळ मातेची पायदळ गावोगावी भटकंती

googlenewsNext

गजानन अक्कलवार

कळंब (यवतमाळ) : एका आईचा मुलगा दीड महिन्यापासून घरातून अचानक गायब झाला. पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिस म्हणतात, तपास सुरू आहे. मुलाच्या शोधार्थ व्याकूळ झालेल्या ‘त्या’ मातेने अंगावरचे संपूर्ण दागिने विकले. घरातील असलेले संपूर्ण पैसे खर्ची घातले. परंतु मुलगा मिळून आलेला नाही. आता ती माता मुलाचा शोध घेण्यासाठी पैशाअभावी चक्क पायदळ गावोगावी भटकंती करीत आहे. शरीरात त्राण नसतानाही तिची चाललेली धडपड कोणाच्याही नजरेतून सुटत नाही.

रुखमाबाई गंगाराम वगारहांडे या ५५ वर्षीय महिलेचा तीस वर्षीय मतिमंद मुलगा किशोर हा १६ डिसेंबर रोजी घरून गायब झाला. यासंदर्भात पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. परंतु पोलिस आजही तपास सुरू आहे, यापलीकडे उत्तर द्यायला तयार नाही. किशोर लहान असतानाच रुखमाबाईच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर मुलगा किशोर आणि एका मुलीचे तिने लोकांकडे धुणीभांडी करून पालनपोषण केले. दरम्यान मुलीचे लग्न झाले. काही काळाने मुलगीही मानसिक आजाराने ग्रस्त झाली. मुलगा किशोर आणि नातू म्हणजेच मुलीचा ११ वर्षीय मुलाला सोबत घेऊन ती कळंबच्या माथा वस्तीमध्ये राहत आहे. परंतु दीड महिन्यापूर्वी तिचा एकमेव जगण्याचा आधार असणारा किशोर अचानक गायब झाला. पाण्यातून मासा बाहेर काढावा, अशी तिची अवस्था झाली आहे.

किशोर किरकोळ मतिमंद असला तरी कधी घर सोडून गेला नाही. किशोरचे आईवर आणि आईचे किशोरवर नितांत प्रेम. त्यामुळेच किशोरच्या शोधासाठी रुखमाबाईने दहा हजारात अंगावर संपूर्ण सोन्याचे मनी विकले. लोकांकडून उसनवारी करून तिने परिसरातील अनेक गावे किशोरसाठी पालथी घातली. गाठीशी असणारा पैसेही तिने मुलाच्या शोधासाठी खर्च केले. परंतु तो कुठेही आढळून आला नाही. मुलाचा चेहरा पाहण्यासाठी अगतिक झालेली ती माता आता पैशाअभावी पायदळच गावागावांतील मंदिर, मज्जीद, हॉटेल, ढाब्यावर जाऊन मुलाचा शोध घेत आहे.

पायी चालल्याने तिच्या पायाला सुज आली. तिचा धीर खचत असला तरी आशा मात्र सोडलेली नाही. असंख्य संकटाचा सामना करीत तिने शोध सुरूच ठेवला आहे. मुलगा कुठे ना कुठे मिळेलच या एकमेव आशेवर तिचा शोधप्रवास अखंड सुरू आहे. मुलाच्या शोधासाठी तिची चाललेली धडपड कोणाच्याही हृदयाला पाझर फोडणारी आहे. मुलाच्या आठवणीत तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत असले तरी हिंमत मात्र कायम आहे. मुलगा मिळेल या आशेवरच ती एक एक दिवस कंठीत आहे. तिची ही करूण कहानी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखीच आहे. याचा क्लायमॅक्स आनंददायी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भांडी धुणीवरच सुरु आहे उदरनिर्वाह

लोकांच्या घरी भांडीधुणी केल्यानंतर ती मिळेल त्याला किशोरची माहिती विचारत असते. कोणी या गावात असेल त्या गावात असेल, असे सांगितले की, ती लगेच मुलाच्या आशेने संबंधित गावाकडे धाव घेते. परंतु मागील दीड महिन्यापासून तिचा भ्रमनिरास होत आहे. तिच्या नातेवाइकांनी किशोरची शोधमोहीम थांबविली असली, तरी तिची धडपड मात्र आजही त्याच ताकदीने सुरू आहे.

Web Title: A mother's wanderings on barefoot in search of her mentally retarded son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.