सोन्याचा अर्धा ग्रॅम दागिना बनला ६ वर्षांच्या चिमुकलीचा काळ ! नथीसाठी शेजाऱ्यांनी तिला घरी बोलावून केला घात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:02 IST2026-03-23T13:59:53+5:302026-03-23T14:02:49+5:30
Yavatmal : लाडक्या चिमुकलीच्या नाकात मोठ्या हौसेने घातलेली आईने सोन्याची नथ तिचा काळ ठरली. अवघ्या अर्ध्या ग्रॅम सोन्यासाठी शेजारच्या कुटुंबातील पाच जणांनी तिचा गळा आवळून हत्या केली.

A half gram of gold jewelry became a 6-year-old girl's life! Neighbors invited her home and ambushed her for her nose ring
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा (यवतमाळ) : लाडक्या चिमुकलीच्या नाकात मोठ्या हौसेने घातलेली आईने सोन्याची नथ तिचा काळ ठरली. अवघ्या अर्ध्या ग्रॅम सोन्यासाठी शेजारच्या कुटुंबातील पाच जणांनी तिचा गळा आवळून हत्या केली. नंतर मृतदेह घरातच पोत्यामध्ये बांधून ठेवला हा धक्कादायक प्रकार तालुक्यातील बोथ येथे घडला. पोलिसांनी चिमुकली दिसली, त्या शेवटच्या ठिकाणावरूनच गुन्ह्याचा उलगडा करत अल्पवयीन मुलीसह एकाच कुटुंबातील पाच जणांना बेड्या ठोकल्या.
शिवानी पंकज जाधव (६) ही नेहमीच आरोपीच्या घरी खेळण्यासाठी जात होती. शुक्रवारी २० मार्च रोजी सकाळी तिला आरोपींनी टरबूज खाण्यासाठी घरात बोलावले. शिवानी व तिचा लहान भाऊ दोघेही तेथे पोहोचले. आरोपी सोनू विलास जाधव याचा टरबूज विक्रीचा व्यवसाय असल्याने त्याने दोघांना टरबूज दिले. शिवानी तेथेच थांबली, तर तिचा भाऊ घराकडे निघून गेला. येथेच शिवानीचा घात झाला. तिच्या नाकातील नथ बळजबरीने आरोपी सोनू जाधव याच्या मुलीने काढून घेतली. आता शिवानी हा प्रकार घरी सांगणार, या भीतीतून तिचा गळा आवळून तिला ठार केले. नंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून घरातील पलंगाखाली ठेवला.
ही थरारक घटना पोलिसांनी शनिवारी दुपारी उघड केली. बेपत्ता शिवानीचा मृतदेह पाहून संपूर्ण बोथ गाव हळहळले. या गुन्ह्यातील नराधम कैलास विलास जाधव (३०), माला कैलास जाधव (२६), सोनू विलास जाधव (३२), रंजना सोनू जाधव (३०) आणि एक विधी संघर्ष मुलगी, यांना ताब्यात घेतले. तपास अधिकारी शिवप्रकाश मुळे यांनी रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, ५ एप्रिलपर्यंतची पोलिस कोठडी दिली आहे.
शेवटचे लोकेशन ठरले तपासाचा धागा
विविध शाखांच्या आठ टीम तयार करून सर्वत्र शोध घेतला, गावातील संशयितांची घरझडती घेतली, तरीही शिवानीचा थांगपत्ता लागत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी शिवानीच्या शेवटच्या लोकेशनवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू करण्यात आला.
सोनू जाधव याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शिवानी गावा बाहेर जाताना दिसल्याचे सांगितले. मात्र, यावेळी सोनू सोबत असणाऱ्याने आम्हाला कुणीच दिसले नाही असे सांगताच, सोनू जाधव खोटा बोलत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतला, तेव्हा शिवानीचा मृतदेह विलास जाधव याच्या घरात आढळून आला.
आरोपीचा कट फसला
आरोपीचा ऑटोने गावोगावी फिरून टरबूज विक्रीचा व्यवसाय आहे. शिवानीचा खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी याच टरबुजाच्या ऑटोत पोत्यात भरलेला मृतदेह टाकून विल्हेवाट लावण्याचा कट रचण्यात आला होता. परंतु, शनिवारी सकाळी पोलिसांनी कुणालाच गावाबाहेर पडू दिले नाही. त्यामुळे हा डाव फसला.
अंत्यसंस्कारात संपूर्ण गाव हळहळले
शिवानीच्या मृतदेहाची यवतमाळ येथे इन कॅमेरा उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता मृतदेह बोथ येथे आणून अंत्यसंस्कार केले. यावेळी संपूर्ण गाव जमा झाले होते, तीच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. एका क्षुल्लक दागिन्यासाठी चिमुकलीला मारून टाकण्यात आल्याने संपूर्ण गाव शोकमग्न होते.
यांनी केला गुन्हा उघड
दारव्हा ठाणेदार शिवाप्रकाश मुळे, एलसीचे एपीआय मनिष गांवडे, पवन राठोड, धीरज बांडे, दिनेश गावंडे, पंकज दाभाडे, योगेश वाघमारे पीएसआय कोरपे, देशमुख, जांभेकर यांच्यासह एलसीबी व दारव्हा ठाण्यातील अंमलदार व आर.सी.पी, क्यु.आर.टी, एस.एफ पथकातील १२० अंमलदार यांनी हा गुन्हा उघड करण्यासाठी परिश्रम घेतले.